पुरंदरमध्ये लड्डा, लोढा ‘शेतकरी’ कधी झाले? मंत्रालयातील गद्दार, दलालांच्या टोळय़ांकडून जमिनीची सौदेबाजी

 ‘मंत्रालयातील काही दलालांनी येथील गद्दारांना हाताशी धरून पुरंदर विमानतळासाठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात घेऊन चढय़ा दराने विकण्याची सौदेबाजी सुरू केली आहे. हा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही. विमानतळासाठी संपादित होणाऱ्या जमिनी लड्डा, लोढा आणि काही अग्रवाल यांच्या आहेत. ते पुरंदरमध्ये ‘शेतकरी’ कधी झाले?’ असा सवाल करून, ‘पुरंदरच्या विमानतळासाठी शेतकऱ्यांची इंचभरदेखील जमीन घेऊ दिली जाणार नाही,’ असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला.

पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर काल (शनिवारी) बेछूट लाठीहल्ला करण्यात आला. यामध्ये अनेक शेतकरी आंदोलक जखमी झाले आहेत. तसेच आपले घरदार, जमीन विमानतळासाठी जाणार, याचा ताण आल्याने काल आंदोलनाच्या वेळीच पुंभारवळण येथील अंजनाबाई  कामठे यांचा मृत्यू झाला. त्यांचे सांत्वन करण्यासाठी व विमानतळबाधित शेतकरी आंदोलकांची भूमिका समजून घेण्यासाठी आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुंभारवळण येथे भेट दिली. त्यांच्यासमवेत शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, तालुकाप्रमुख अभिजित जगताप, किरण दावलकर, राजेंद्र जगताप, राजेंद्र क्षीरसागर, शुभम झिंझुर्पे, पुंभारवळण गावच्या सरपंच अंजुश्री गायकवाड, उपसरपंच संदीप कामठे उपस्थित होते.

यावेळी पुंभारवळण येथे झालेल्या शोकसभेत बोलताना दानवे म्हणाले, ‘भूसंपादन अधिकाऱ्यांना, कलेक्टरला शेतकऱ्यांच्या वेदना कळणार नाहीत. जमीन, घरदार जाण्याच्या वेदनेतूनच अंजनाबाई कामठे यांचे निधन झाले. याला सरकार जबाबदार आहे. विमानतळासाठी 2673 हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. यातील 10 हेक्टर जमीन बिनशेतीची, तर 428 हेक्टर जमीन जिराईत आहे. 2232 हेक्टर बागायत क्षेत्र आहे. म्हणजे 85 टक्के जमीन बागायती आहे. कायद्यानुसार बागायत जमीन सरकारला घेता येणार नाही. आंदोलकांनी भावनिक होऊ नये. आपण कायदेशीर लढा देऊ.’

दानवे म्हणाले, ‘पोलिसांच्या लाठीमारात हे आंदोलक जखमी झालेत. काल पोलिसांनी पकडलेल्या शेतकरी आंदोलकांवर 307, 353 यांसारखी कलमे लावली. पोलिसांनी यांना जखमी केले आहे. त्यामुळे पोलिसांवरही कलमे लावली पाहिजेत. कायदा सर्वांना सारखा आहे. आमचा लढा शासनाशी आहे, पोलिसांशी नाही.