
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. वैभवीला बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. पण या घवघवीत यशाचा आनंद साजरा करताना पाठीवर वडिलांची थाप पडणार नाही अशी खंत वैभवीने व्यक्त केली आहे.
आज राज्यात बारावीचा निकाल लागला. संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. तिला या परीक्षेत 85.33 टक्के मिळाले आहेत. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर वैभवी म्हणाली की, हा निकाल मला अपेक्षित नव्हता. माझ्या वडिलांची निर्घृण हत्या झाली, त्याच दुःखात मी परीक्षा दिल्या. आज हे यश पहायला माझे वडिल माझ्यासोबत नाहीत ही खंत आहे. माझ्या पाठीवर त्यांची थाप नाही. माझ्या वडिलांना आमच्या कुटुंबापासून, गावापासून त्यांना हिरावलं गेलं. माझे वडिल गेल्याने आमचं कुटुंब उघड्यावर पडलं. त्यामुळे माझ्या वडिलांच्या खुनातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी वैभवीने यावेळी केली आहे.
तसेच माझी नीटची तयारी सुरु आहे अशी माहिती वैभवीने दिली. पण काल जो नीटचा पेपर झाला त्यात मला खूप कमी गुण मिळालेत. असे असले तरी माझ्या वडिलांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे असा विश्वास वैभवीने व्यक्त केला.