हैदराबादला पावसाचा हादरा; दिल्लीच्या मदतीला पाऊस, हैदराबाद स्पर्धेतून अधिकृतरीत्या बाद

गुजरातविरुद्ध झालेल्या पराभवानंतरच हैदराबादच्या प्ले ऑफच्या आशा धूसर झाल्या होत्या, पण आज दिल्लीला 133 धावांत रोखल्यामुळे त्यांना विजयाची नामी संधी होती. मात्र पावसाच्या जोरदार आगमनाने हैदराबादची प्ले ऑफच्या आशेची ज्योत पूर्णपणे विझवली. संकटात सापडलेल्या दिल्लीच्या मदतीला पाऊस आल्यामुळे सामना रद्द झाला आणि त्यांना एका गुणाचा फायदा झाला. दिल्लीचा डाव झाल्यानंतर पावसाचे जोरदार आगमन झाले आणि त्यानंतर पुन्हा खेळच सुरू होऊ शकला नाही. चेन्नई, राजस्थानपाठोपाठ गत उपविजेता हैदराबादही बाद झाला आहे.

पॅट कमिन्स पेटला

आयपीएलच्या हंगामात पॅट कमिन्सला आपल्या लौकिकानुसार खेळ करता आला नसला तरी आज त्याने दिल्लीच्या डावाला चांगलेच पेटवले. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर करुण नायरची विकेट काढत दिल्लीचा जबर धक्का दिला. मग त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाच्याही पहिल्याच चेंडूवर फॅफ डय़ू प्लेसिस (3) आणि अभिषेक पोरेलची (8) विकेट काढत दिल्लीला हादरवले. मग हर्षल पटेलने कर्णधार अक्षर पटेलला कमिन्सच्या हातात झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे 4 बाद 26 अशा बिकट स्थितीत असलेल्या दिल्लीला केएल राहुलच्या आधाराची गरज होती, पण जयदेव उनाडकटने राहुलला किशनकरवी बाद केले. इशानने पाचपैकी चार फलंदाजांचे झेल मागे टिपल्यामुळे दिल्लीची 5 बाद 29 अशी केविलवाणी अवस्था झाली.

आशुतोषचा इम्पॅक्ट

पॉवर प्लेमध्येच दिल्लीची भयाण अवस्था झाली. कमिन्सने आपल्या पहिल्याच हप्त्यात दिल्लीचा पराभव निश्चित केला. मात्र ट्रिस्टन स्टब्ज आणि विपराज निगमने 33 धावांची भागी करत दिल्लीची घसरगुंडी रोखली. विपराज (18) धावबाद झाल्यामुळे दिल्लीचे संकट आणखी गहिरे झाले. तेव्हा पोरेलच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आशुतोष शर्माला स्थान मिळाले आणि त्याने 26 चेंडूंत 3 षटकार आणि 2 चौकार खेचत 41 धावा केल्या आणि दिल्लीच्या धावसंख्येचा चेहरामोहराच बदलला. आशुतोषने ट्रिस्टनच्या (41) साथीने सातव्या विकेटसाठी सात षटकांत 66 धावांची अफलातून भागी रचली आणि संघाला सवाशे पलीकडे नेले. त्याच्या इम्पॅक्टमुळेच दिल्लीला संकटातून समाधानापर्यंत झेप घेता आली.