
नॅक आणि सीडीसी न करणाऱया 229 महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियन 2016 च्या कलम 110 (4) आणि कलम 97 अन्वये नॅक/एनबीए अधिस्विकृती आणि पुनर्अधिस्वीपृतीची आवश्यक पूर्तता न केल्यामुळे तसेच महाविद्यालय विकास समितीची (सीडीसी) स्थापना न केल्यामुळे 229 महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून स्थगित करण्यात येणार आहे. तसेच रुपये 10 हजार इतकी दंडाची कार्यवाहीसुद्धा करण्यात आली. या सर्व संबंधित संलग्नित महाविद्यालयांना वेळोवेळी परिपत्रक, सूचना आणि स्मरणपत्र काढूनही आवश्यक पूर्तता न केल्यामुळे या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव व्यवस्थापन परिषदेने घेतला. यामध्ये नॅक/एनबीएची आवश्यक पूर्तता न करणारी 156 महाविद्यालये असून महाविद्यालय विकास समितीची (सीडीसी) स्थापना न करणाऱया 73 महाविद्यालयांचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांची यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.