
देशाचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱया तसेच पहलगाम हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देणाऱया सर्व हिंदुस्थानी जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी देशवासीयांचा विश्वास सार्थ ठरवला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
हवाई दलाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. लष्कराच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
पहलगाममध्ये 26 ते 27 लोक मृत्युमुखी पडले होते त्याचा हिशेब करायचा होता. मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये हिंदुस्थान आक्रमक आहे असे चित्र होऊ नये अशी खबरदारी हवाई दलाने घेतली हे योग्य असल्याचे शरद पवार म्हणाले. काही निष्पाप भगिनींचे कुंकू पुसले गेले होते त्यामुळे या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव दिले असेल तर योग्य असल्याचेही ते म्हणाले.