
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले. मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान आहे, असे म्हणत 11 वर्षांची मुलगी वर्तिका हिने वडिलांना कडक सॅल्यूट ठोकला.
वर्तिका म्हणाली, ‘मला पप्पांचा खूप अभिमान आहे. पप्पा खूप चांगले होते. शत्रूंचा खात्मा करून ते स्वतः शहीद झाले. माझ्या पप्पांनी देशाचं रक्षण केले. मी रात्री 9 वाजता पप्पांशी शेवटचे बोलले होते. मी पप्पांना सांगितलेलं की, इथे ड्रोन उडत आहेत, पण कोणतेही हल्ले होत नाहीत. आम्ही सर्व सुरक्षित आहोत.’
वर्तिका पुढे म्हणाली, ‘पाकिस्तानचा खात्मा झाला पाहिजे. मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन. मी दहशतवाद्यांना मारेन.’ शहीद सुरेंद्र मोगा यांचे पार्थिव झुंझुनू येथील मांडवा येथे रविवारी पोहोचले. मांडवा शहरातील बिसाऊ क्रॉसिंगवरून त्यांचे पार्थिव मेहरादासी गावात आणलं. यावेळी मोठय़ा संख्येने गावकरी उपस्थित होते.
सुरेंद्र मोगा यांचे वडीलही सैन्यात होते. त्यांची 1 जानेवारी 2010 रोजी हवाई दलात निवड झाली. ते उधमपूर हवाई तळावर तैनात होते. राजस्थान पब्लिक स्कूल आणि झुनझुनू येथील जीआर पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी झुंझुनूच्या मोरारजी कॉलेजमधून बीएससी केलं. तीन मोठय़ा बहिणींव्यतिरिक्त कुटुंबात सर्वात धाकटा भाऊ, 11 वर्षांची मुलगी, पत्नी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे.
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील सुरेंद्र मोगा शहीद