
63 व्या सर बेनेगल रामा राव आरबीआय बँक शील्ड क्रिकेट स्पर्धेत प्लेट ग्रुप सामन्यात फिरकीवीर अमेय बोथारेच्या (5 धावांत 5 विकेट) अचूक गोलंदाजीच्या जोरावर एचडीएफसी बँक स्पोर्ट्स क्लबने अभ्युदय बँक स्पोर्ट्स क्लबविरुद्ध 57 धावांनी विजय मिळवला.
शनिवारी पडलेल्या पावसामुळे सामन्यांतील षटकांची संख्या कमी करण्यात आली. ओव्हल मैदानावरील सरकारी लॉ कॉलेजच्या मैदानावर झालेल्या लढतीत रविवारी एचडीएफसी बँकेने 8 षटकांत 5 बाद 96 धावा केल्या. त्यात यश छज्जरने सर्वाधिक 48 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अमेयसह शुभ रजकच्या अचूक माऱयासमोर अभ्युदय बँकेला 7.5 षटकांत 9 बाद 39 धावा करता आल्या.
तत्पूर्वी, शनिवारी शिवाजी पार्क जिमखाना येथे 20 षटकांच्या लढतीत आयसीआयसीआय बँकेने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेवर 4 विकेट राखून मात केली. अष्टपैलू श्रेयस तांडेल (2 विकेट आणि 41 धावा) त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शिवाजी पार्कवरील सेंट्रल रेल्वे मैदानावर झालेल्या प्रत्येकी 16 षटकांच्या लढतीत डय़ुश बँकेने बँक ऑफ बडोदा संघाला 7 विकेटनी हरवले.