
तिकडून गोळ्या झाडल्या तर इकडून तोफगोळय़ांचा मारा करणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धजन्य स्थितीत पाकिस्तानला दिला होता, अशी माहिती समोर आली आहे. शस्त्रसंधीच्या आधी हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्र्यांमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती. दोन्ही देशांचे डीजीएमओ म्हणजेच आर्मी ऑपरेशन महासंचालकांदरम्यान शस्त्रसंधीबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान म्हणाले होते आता केवळ एकच गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे पाकिस्तानव्याप्त कश्मीर परत घेणे. बोलण्यासारखे आता काहीच नाही. जर ते दहशतवाद्यांना हिंदुस्थानच्या ताब्यात देण्याबद्दल बोलतील तर आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो, असेही पंतप्रधानांनी नमूद केले होते. कुणी मध्यस्थी करावी अशी आमची इच्छा नाही. कुठल्याही दुसऱ्या विषयावर माझे काहीही मत नाही, असेही पंतप्रधान म्हणाले होते. ‘एनआय’ने हे वृत्त दिले आहे.