येऊरच्या जंगलातून प्राणी, पक्षी पळाले; गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ध्याच वन्यजीवांची नोंद, बिबट्याची तर गणतीच नाही

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमध्ये नंगानाच, फटाके तसेच डिजेचा कर्णकर्कश आवाज पुन्हा वाढल्याने या जंगलातून प्राणी, पशू पळाले असल्याची माहिती समोर आली आहे. बुद्ध पौर्णिमेदिवशी चांदण्यांच्या लख्ख प्रकाशामध्ये झालेल्या गणनेत फक्त 61 वन्यजीवांची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत प्राण्यांची संख्या अर्धीच आहे. विशेष म्हणजे पाणवठ्यावर बिबटे आलेच नसल्याने बिबट्यांची गिनतीच झालेली नाही. दरम्यान, प्राणी वाचवायचे असल्यास येऊरच्या हुल्लडबाजीला लगाम घालावा अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

बुद्ध पौर्णिमेला चांदण्यांच्या प्रकाशामध्ये राज्यात सर्वच राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांची गणती करण्यात आली. त्यानुसार 103 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील येऊरच्या पाणवठ्यांसमोर मचाण बांधण्यात आले होते. त्यावर बसलेल्या स्वयंसेवकांनी प्राणी व पक्ष्यांची गणना केली. या जंगलात 17 लंगुर, 19 वटवाघुळे, 8 माकडे, 7 घुबड, सांबर, मुंगूस, रानमांजर, सर्प, गरुड अशा 61 वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे

प्राणी कमी दिसल्याने अनेकांचा हिरमोड

गेल्या वर्षीच्या तुलनेत येऊरमध्ये वन्यप्राण्यांच्या संख्येत घट झाली आहे. यावर्षी उन्हाळा तीव्र असल्याने पाणवठ्यावर प्राणी जास्त येतील अशी आशा वनाधिकारी आणि प्राणीमित्रांना होती. मात्र रात्रभर डोळे लावूनही प्राणी कमी दिसल्याने अनेकांचा हिरमोड झाला असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

बिबटे नेमके गेले कुठे?

यंदा पाणवठ्यावर बिबट्यांचे दर्शन झाले नाही. याआधी 2015 मध्ये दोन, 2016 मध्ये तीन, 2017 व 18 मध्ये अनुक्रमे चार बिबट्यांची गणतीत नोंद झाली होती. यंदा बिबटे पाणवठ्यावर आलेच नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वी येऊरच्या एअरफोर्स परिसरात दोन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. दरम्यान, बिबटे नेमके गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.