
>> विनिता शाह
गेल्या काही दिवसांत भारतात महिलांविरोधातील गुह्यांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे जगभरात आपली नाचक्की होत असतानाच विदेशी महिला पर्यटकही नराधमांच्या वासनांचे बळी ठरत आहेत. ही बाब प्रचंड चिंताजनक आहे. कर्नाटकातील हम्पी येथे एक इस्रायली महिला आणि एका भारतीय महिलेसह दोन महिलांवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच दिल्लीमध्ये एका ब्रिटिश पर्यटकावर अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले. अशा घटनांमुळे भारताच्या जागतिक प्रतिमेवर गंभीर परिणाम होत आहे.
पर्यटन व्यवसाय हा भारताच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. भारतात जीडीपीच्या 6.7 टक्के योगदान पर्यटन उद्योगाचे आहे. 2014-15 साली पर्यटन आणि हॉटेल्स क्षेत्राची एकूण उलाढाल सुमारे 28 लाख कोटी रुपये होती, जी 2025 सालापर्यंत 58 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पर्यटन क्षेत्रामुळे देशातील एकूण रोजगारामध्ये 8.78 टक्के योगदान असून त्यामुळे जवळ जवळ 2 कोटी लोकांना रोजगार मिळतो. विदेशी पर्यटकांच्या आगमनामुळे भारताला परकीय चलन मिळते. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी ते महत्त्वाचे ठरते. ब्युरो ऑफ इमिग्रेशन डेटानुसार, 2023 मध्ये भारतात 9.52 दशलक्ष परदेशी पर्यटकांचे आगमन झाले. 2022 च्या तुलनेत ही संख्या जवळपास 50 टक्क्यांनी वाढली. त्यातून 2,31,927 कोटी रुपयांची परकीय चलन कमाई झाली असून 2022च्या तुलनेत ती 36.5 टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले. भारतातील नितांतसुंदर निसर्ग किनारे, थक्क करणाऱ्या स्थापत्य कलेचा आविष्कार असणारी धार्मिक स्थळे, खजुराहोची मंदिरे, गडकिल्ले, राजमहल, सांस्कृतिक परंपरा, लोकपरंपरा, लेण्या यांसारख्या असंख्य गोष्टी विदेशी पर्यटकांना खुणावत असतात. याखेरीज भारतातील कायदा-सुव्यवस्था हाही घटक विदेशी पर्यटकांसाठी महत्त्वाचा ठरतो, परंतु समाजातील काही विकृतींमुळे विदेशी पर्यटकांसोबत गैरवर्तन केले जाते आणि भारताच्या प्रतिमेला धक्का बसतो.
गेल्या काही दिवसांत भारतात महिलांविरोधातील गुह्यांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे जगभरात आपली नाचक्की होत असतानाच विदेशी महिला पर्यटकही नराधमांच्या वासनांचे बळी ठरत आहेत. ही बाब प्रचंड चिंताजनक आहे. कर्नाटकातील हम्पी येथे एक इस्रायली महिला आणि एका भारतीय महिलेसह दोन महिलांवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच दिल्लीमध्ये एका ब्रिटिश पर्यटकावर अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अशा घटनांमुळे भारताच्या जागतिक प्रतिमेवर गंभीर परिणाम होत आहे.
हम्पीतील घटना अत्यंत भयावह होती. रात्री कॅम्पिंग करणाऱ्या तीन पर्यटकांना गुन्हेगारांनी नाल्यामध्ये फेकले आणि नंतर इस्रायली महिला आणि एका भारतीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात नदीत फेकलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह सापडला आहे. पीडितांमध्ये एक अमेरिकन आणि दोन भारतीय होते. या गुन्हेगारांनी केवळ बलात्कारच केला नाही, तर मारहाण आणि लुटीचाही प्रकार घडवून आणला. जरी तीनही गुन्हेगारांना अटक करण्यात आली असली तरी देशाच्या प्रतिष्ठेला जो धक्का बसला आहे, त्याची भरपाई करणे कठीण आहे. भारताबाबत परदेशात सातत्याने नकारात्मक प्रतिमा तयार होत असून दूरस्थ पर्यटनस्थळी अशा घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
दिल्लीतील घटनेत एक युवकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रिटिश महिलेशी मैत्री केली आणि तिला भारतात येण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच ब्रिटिश दूतावासाने त्यावर गांभीर्याने लक्ष दिले आहे. अशा घटनांमुळे परदेशी सरकारे त्यांच्या नागरिकांसाठी भारताबाबत काही नकारात्मक सल्ला जारी करण्याची शक्यता आहे.
भारत हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्गसौंदर्याने परिपूर्ण देश असून जगभरातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण केंद्र आहे, परंतु अलीकडील काही दशकांमध्ये विदेशी महिला पर्यटकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांनी भारताची प्रतिमा कलंकित केली आहे. अशा घटनांमुळे भारतातील महिलांची सुरक्षा आणि न्यायव्यवस्थेची कार्यक्षमता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विदेशी पर्यटकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना 2000 नंतर विशेषतः चर्चेत आल्या. 2008 मध्ये घडलेल्या गोव्यातील स्कार्लेट किलिंग या ब्रिटनमधील 15 वर्षीय मुलीवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. ही घटना भारतात विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण करणारी ठरली. त्यानंतर गोवा आणि भारतातील इतर पर्यटनस्थळांवर सुरक्षेच्या उपाययोजना वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. स्कार्लेट किलिंग प्रकरण अजूनही गोव्यातील सर्वात वादग्रस्त गुन्ह्यांपैकी एक मानले जाते. काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील दतिया येथे सायकल सफारीसाठी आलेल्या एका स्विस महिलेवर काही स्थानिकांनी सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. या घटनेने जागतिक स्तरावर तीव्र निषेध उमटला आणि भारतातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाले. 2014 मध्ये जपानमधील एका महिलेची फसवणूक करून तिला पैदेत ठेवून वाराणसीत बलात्कार करण्यात आला. हे प्रकरणही अत्यंत संतापजनक होते. 2016 मध्ये पुन्हा गोव्यात एका ब्रिटिश महिलेवर बलात्काराचा प्रकार घडला. 2018 मध्ये राजस्थानमध्ये अमेरिकन पर्यटक महिलेवर बलात्कार झाला होता.
विदेशी महिलांवरील अशा घटनांचा भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रभाव गंभीर आहे. अशा घटनांमुळे भारताची जगभरात नकारात्मक प्रतिमा तयार होते. अनेक देश त्यांच्या नागरिकांना भारतात पर्यटनासाठी येण्यापूर्वी सतर्क राहण्याच्या सूचना देतात. ब्रिटन, अमेरिका, पॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी त्यांच्या महिलांना भारतात प्रवास करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारत हा पर्यटनासाठी प्रसिद्ध देश असून दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक येथे येतात. यामध्ये महिलांचा समावेशही मोठय़ा प्रमाणावर असतो, पण महिलांवरील वाढत्या गुह्यांमुळे विदेशी पर्यटनात घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः गोव्यासारखे राज्य तर पूर्णतः विदेशी पर्यटनावर अवलंबून आहे. जगभरातून गोव्याचे समुद्रकिनारे पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांसह अन्य राज्यांतही विदेशी पर्यटकांची रेलचेल मोठय़ा प्रमाणावर असते. या पर्यटकांना सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही सरकारांची जबाबदारी आहे. सरकारवर असणाऱ्या विश्वासाचा हा भाग आहे, पण या विश्वासाला तडा जात असेल तर पर्यटक भारताऐवजी थायलंड,श्रीलंका किंवा इतर देशांना प्राधान्य देऊ लागण्याची शक्यता आहे. विदेशी महिलांवरील अत्याचार भारताच्या पर्यटन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक मूल्यांना मोठा धक्का देत आहेत. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.