पहलगाम हल्ल्यानंतर घोडेवाले बेरोजगार

जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे घोडेस्वार आणि स्थानिक छोटे-मोठे व्यावसायिक बेरोजगार झाले असून उपासमारीचे संकट आहे. पर्यटनातील घसरणीमुळे त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. एकेकाळी गजबजलेले पहलगाम आता निर्जन पडले आहे. पर्यटनावर अवलंबून असलेले 5,000 घोडेस्वार आणि सुमारे 600 वाहन मालक बेरोजगार झाले. पहलगामची ‘मिनी स्वित्झर्लंड’ अशी ओळख आहे. मात्र 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी पाठ फिरवली.

घोडेस्वारांच्या असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल वाहिद वाणी यांनी हजारो घोडे मालकांबद्दल चिंता व्यक्त केली. हजारो लोक आता त्यांच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी संघर्ष करत असून पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे स्थानिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पहलगामची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.

दहशतवाद्यांचा अजेंडा हाणून पाडावा

देशभरातील पर्यटकांनी येथे येऊन दहशतवाद्यांचा अजेंडा हाणून पाडला पाहिजे. पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या 600 हून अधिक वाहन मालकांनीही त्यांचे उत्पन्नाचे स्रोत गमावले आहेत. पर्यटकांशिवाय आमच्याकडे काम नाही आणि उत्पन्नही नाही. त्यामुळे येथील लोक अडचणीत आहेत, असे पहलगाम सुमो स्टँडचे अध्यक्ष गुलजार अहमद यांनी सांगितले.