वंचितांना घाबरून मोदींनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, राहुल गांधी यांचा दावा

देशातील वंचित समाजाला घाबरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, असा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. विरोधी पक्ष वंचित समुदायासाठी खंबीरपणे उभा आहे, असेही ते म्हणाले. बिहारच्या दरभंगा येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी राहुल गांधी यांनी कुठलीही सूचना न देता कार्यक्रमाला हजेरी लावल्याचा दावा करत त्यांना कार्यक्रम स्थळी जाण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांनी कार बाहेरच सोडून चालत जाऊन कार्यक्रम स्थळ गाठले.

माझी गाडी मिथीला विद्यापीठाच्या गेटबाहेरच रोखली, परंतु मी हार मानली नाही. मी गाडी गेटबाहेर सोडून नागमोडी रस्त्याने वळणे घेत चालत तुमच्यापर्यंत आलो, असे राहुल गांधी विद्यार्थ्यांना म्हणाले. शिक्षा न्याय संवाद या कार्यक्रमादरम्यान त्यांनी विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राहुल गांधी म्हणाले, तुम्हाला माहीत आहे का, बिहार सरकार मला का थांबवू शकले नाही. कारण मी तुमच्या प्रचंड ऊर्जेमुळे प्रेरित असून त्या ऊर्जेपुढे नरेंद्र मोदी यांना झुकावे लागले, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने कार्यक्रम दुसऱया ठिकाणी घेण्यास सांगितले होते, परंतु काँग्रेसने त्यांची सूचना फेटाळून लावली. त्यामुळे राहुल गांधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रांगणात कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात आले.

आम्ही जसे सांगितले तसे मोदींनी केले

आम्ही मोदींना सांगितले संविधान डोक्याला लावा. त्यांनी तसेच केले. आम्ही त्यांना जातनिहाय जनगणना करावीच लागेल असे सांगितले, दोन्ही वेळेला त्यांनी तुम्हा लोकांच्या भीतीने आमची मागणी मान्य केली, परंतु सत्य हे आहे की त्यांचे सरकार अंबानी, अदानी आणि त्यांच्यासारख्या लोकांच्या हितासाठी काम करते. सरकारी व्यवस्था केवळ पाच टक्के लोकसंख्येच्या हितासाठी काम करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. दलित, ओबीसी आणि आदिवासींसाठी इथे काहीच नाही. मग ते सरकार असो किंवा कॉर्पोरेट जगत किंवा मीडिया, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी पाहिला ‘फुले’ सिनेमा

राहुल गांधी यांनी तब्बल 400 सामाजिक कार्यकर्त्यांसोबत ‘फुले’ सिनेमा पाहिला. केवळ 400 सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सिनेमाच्या तिकीट्स होत्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, ‘फुले’ सिनेमा पाहून राहुल गांधी प्रचंड भावूक झाले. त्यांनी ‘एक्स’वरून भावना व्यक्त केल्या. शिक्षण, समानता आणि न्यायाचा रस्ता सोपा नाही. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन, त्यांचा संघर्ष व आदर्श आज आपला समाज, देशाला मार्गदर्शन करू शकतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.