
मुंबई महानगरपालिकेने या वर्षी नालेसफाईसह मिठी नदीमधील गाळ काढण्यास महिनाभर उशिराने सुरुवात केल्यामुळे अनेक ठिकाणी नाले गाळाने भरलेलेच आहेत. मिठी नदीमधील तर तब्बल 60 टक्के गाळ काढणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे पालिका 31 मेची डेडलाइन कशी पाळणार असा सवाल निर्माण झाला आहे.
मिठी नदी ही मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मिठी नदी प्रदूषित झाल्याने तिचे नैसर्गिक रूप हरवले आहे. कधी एकेकाळी वाहती आणि समृद्ध नदी कालांतराने घनकचरा, सांडपाणी, अतिक्रमण आदी समस्यांनी ग्रासल्याने नदीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सफेद पूल नाला, मरोळ बापट नाला आणि वाकोला नाला असे नाले या मिठी नदीलाच येऊन मिळतात. त्यामुळे ही नदी एका मोठ्या नाल्याप्रमाणेच भासते. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून मिठी नदीतून गाळ उपसा केला जातो. दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्यावर सुरू होणारी नालेसफाई या वर्षी 25 मार्चपासून सुरू झाल्याने 31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागणार आहे.
नागरी वस्तीत पाणी घुसण्याचा धोका
मिठी नदीची परिणामकारक सफाई झाली नाही तर अतिवृष्टीप्रसंगी समुद्राला भरती आल्यास नदीचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पालिकेकडूनही संबंधित धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात येतात.
असे होतेय काम
मिठी नदीतला गाळ तीन टप्प्यांत काढला जातो. यापैकी पवई फिल्टरपाडा ते कुर्ला सीएसटी पूल, बीकेसी कनेक्टर पूल ते माहीम कॉजवे आणि कुर्ला सीएसटी पूल ते कनेक्टर बीकेसी पूल अशा प्रकारे काम चालते.
यापैकी पहिल्या दोन टप्प्यांतील कामाला 2 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मिठी नदीमधून या वर्षी 2124315.49 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत यातील 87308.45 मेट्रिक टन म्हणजेच केवळ 40.72 टक्केच गाळ काढण्यात आला आहे.