
ठाणे खाडी पुलावर वाशी येथे बांधण्यात आलेल्या सहा पदरी पुलामुळे मच्छीमारांचे नुकसान झाले असून या मच्छीमारांना अंतिम नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. न्यायालयाने याची दखल घेत भरपाईच्या मूल्यांकनासाठी ‘टीस’ची नियुक्ती केली असून ‘टीस’ला याबाबतचा अहवाल 21 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने ठाणे खाडी पुलावर वाशी येथे सहा पदरी मार्ग बांधण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वाशी, कोपरखैरणे व नवी मुंबईतील मच्छीमार बाधित होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करत मरिआई मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने एमएसआरडीसीला ऑगस्ट 2021 साली टीसीबी कंपेन्सेशन कमिटी स्थापन करण्यास व नुकसानग्रस्तांना तात्पुरती प्रत्येकी एक लाख रुपये भरपाई देण्यास सांगितले. मात्र अंतिम भरपाई अद्याप देण्यात न आल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला व न्यायमूर्ती फिरदोश पुनिवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने मच्छीमारांच्या अंतिम भरपाईसाठी व त्याच्या मूल्यांकनासाठी ‘टीस’ची नियुक्ती केली.
न्यायालय काय म्हणाले
- टीसीबी-3 चा प्रकल्पग्रस्त मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होईल.
- पुलामुळे झालेले नुकसान नेमके किती हे अचूकतेने निश्चित करता येत नाही हे स्पष्ट असले तरी सर्व संबंधित घटकांचा विचार करून नुकसान आणि तोटा निश्चित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
एमएसआरडीसी म्हणते नुकसान नाही
एमएसआरडीसीतर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, सीएमएफआरआयच्या अंतिम अहवालात कोणतीही त्रुटी नाही आणि मच्छीमारांचे कोणतेही नुकसान झाले नाही. त्यामुळे आणखी कोणतीही भरपाई देण्याची आवश्यकता नाही.