
आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या घडत असलेल्या विविध घडामोडींचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होताना आपल्याला दिसत आहे. शेअर मार्केट, तंत्रज्ञान, औषधे यांच्यावरदेखील त्याचा मोठा परिणाम होतो आहे. या सगळ्या गडबडीत सोन्याची चर्चा सर्वात जास्त होत आहे. कधी या बहुमूल्य धातूचा भाव एकदम उसळी घेतो आहे, तर कधी एकदम खालच्या दिशेने धावतो आहे. त्यात सोने म्हणजे हिंदुस्थानी माणसाचा जीव की प्राण असल्याने त्याच्या या चढ-उताराची चर्चा रंगली नसती तर नवल!
सोन्याविषयी आपल्या प्रत्येकाला ओढ असली तरी हे सोने नक्की पृथ्वीवर कधी आणि कसे निर्माण झाले, याबद्दल अनेक लोकांना कल्पना नसते. अनेकांना सोन्याची निर्मिती ही पृथ्वीच्या निर्माणासोबत झाली असे वाटते. मात्र ते अगदी चूक आहे. सोने हे खरे तर अंतरीक्षातून पृथ्वीवर आले हे ऐपून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल. अवकाशात सुपरनोव्हा न्यूक्लियोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे सोन्याची निर्मिती होते. आकाराने प्रचंड असलेले तारे फुटतात, त्यांचा स्फोट होतो आणि त्यातून सोन्यासारख्या धातूंची निर्मिती होते. हे निर्माण झालेले सोने मग अवकाशात पसरते. असे म्हणतात की, पृथ्वीवर जेवढे सोने आहे, ते सर्व मृत ताऱ्यांकडून पृथ्वीवर आले आहे.
संशोधक सांगतात की, सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर उल्कापिंडाचा प्रचंड मोठा वर्षाव झाला आणि त्यातून सोने आणि इतर मौल्यवान धातू जसे की प्लॅटिनम, तांबे हे पृथ्वीवर पोहोचले. पृथ्वीच्या बाहेरील थराची घनता कमी असल्याने हे सोन्यासारखे जड धातू पृथ्वीच्या पोटात शिरले. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापेक्षा पृथ्वीच्या पोटात सोन्याचे प्रमाण जास्त आढळते. देशात व्यापाराच्या माध्यमातून सोने येण्यास सुरुवात झाली. हिंदुस्थानात प्राचीन काळापासून कपडे, मसाले अशा वस्तूंच्या निर्यातीच्या बदल्यात सोने स्वीकारण्याची परंपरा होती. अनेक शतके आपण हे सोने जमा करत आहोत. एका अंदाजानुसार सध्या हिंदुस्थानात 10 हजार टनापेक्षा जास्त सोन्याचा साठा आहे.