
बांगलादेशी घुसखोरांना बनावट पासपोर्ट बनवून देणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. दोघांच्या मुसक्या आवळल्या असून एकाला तर कर्नाटकच्या कलबुर्गी गावातून उचलले. बांगलादेशींना आश्रय देणाऱ्या दोघांनाच सध्या पकडले असले तरी त्यामागे मोठी टोळीच कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. बनावट पासपोर्टसह आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र असे वास्तव्याचा पुरावा असणारी कागदपत्रे तयार करण्याचा गोरखधंदा ही टोळी करीत होती.
काही दिवसांपूर्वी पनवेलच्या करंजाडे भागातील इमारतीवर छापा टाकून तेथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करून राहणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यात तीन महिलांचा समावेश होता. या सर्वांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे हिंदुस्थानचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्रे आढळून आली. त्याची सखोल तपासणी केली असता सर्व पुरावे बनावट असल्याचे लक्षात आले. पनवेलमधील मोहम्मद इस्माईल अमीनोद्दीन येऊलकर याच्याकडून खोटी कागदपत्रे बनवून घेतल्याची कबुली पाचही बांगलादेशी घुसखोरांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी येऊलकर याचा शोध घेऊन त्याला अटक केली. येऊलकर यास सहआरोपी केले असून पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कर्नाटकच्या कलबुर्गी गावात राहणाऱ्या इस्माईल शेख याच्यामार्फत बोगस पासपोर्ट, आधारकार्ड, जन्मदाखले, पॅनकार्ड तयार करून घेतल्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने कर्नाटकात जाऊन इस्माईलचा ठावठिकाणा शोधून काढला. तसेच त्याला अटकही केली. बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानात राहण्यासाठी बनावट पुरावे बनवून देणारी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
भाईंदरमध्येही छापा
पनवेलमध्ये अटक केलेल्या पाच बांगलादेशी घुसखोरांचे काही नातेवाईक मीरा-भाईंदरमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या आधारे छापा टाकून राहुल उर्फ मिकाईल इस्माईल गाझी आणि त्याची आई सुफिया बेगम इस्माईल गाझी या दोघांना खरीगाव येथे अटक केली. 2012 मध्ये सुफिया बेगम हिच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच न्यायालयाने अटक वॉरंटही काढले होते.