
परळी येथे शुक्रवारी सायंकाळी एका तरुणाला गुंडांच्या टोळीकडून बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या टोळक्याने तरुणाचे अपहरण करून त्याला डोंगरदऱयात नेऊन मारहाण केली. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव असून ‘तुझाही संतोष देशमुख करू’ अशी धमकी या टोळक्याने दिल्याचे शिवराजने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी सायंकाळी शिवराज दिवटे या तरुणाला गुंड टोळक्याकडून बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. शिवराजने आज पत्रकारांशी बोलताना नेमके काय घडले हे सांगितले. जलालपूर येथे हरिनाम सप्ताहात प्रसाद घेण्यासाठी आपण गेलो होते. तेथे भांडण सुरू होते. भांडण संपल्यानंतर मी शिवाजीनगरला मित्राला सोडून पेट्रोलपंपाकडे जात असताना मोटारसायकलवर आलेल्या टोळक्याने मला मारहाण करून रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले. ‘तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू’ अशी धमकी देत त्यांनी बेदम मारहाण केली, असे तो म्हणाला. दोन जणांनी मला त्या गुंडांच्या टोळक्याच्या हातून वाचवले नसते तर मी मेलोच असतो अशी भीतीही त्याने व्यक्त केली.
ऑपरेशन सिंदूरसारखे ऑपरेशन राबवा – अंजली दमानिया
परळी दहशतीचा अड्डा झाला आहे. याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच बीडमध्येही गुंडांच्या विरोधात एखादे ऑपरेशन राबवण्याची गरज असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली.
जातीय रंग देऊ नका
परळीतील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तत्कालिक कारणातून झाली आहे. या प्रकरणाला पुठलाही जातीय रंग देऊ नये, असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी केले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक केली असून त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत.
वीस जणांवर गुन्हा
मारहाण प्रकरणात पोलिसांनी तेलगाव येथून चार जणांना तर परळीतून तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीतेसह एकूण वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.