
गुजरातमध्ये मनरेगाच्या कामात 71 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. गुजरातमधील मंत्री बाछू खाबड यांचा मुलगा बलवंत खाबडने हा घोटाळा केला असून पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. अखेर पोलिसांनी बलवंत खाबडच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दाहोद जिल्ह्यात श्री राज कन्स्ट्रक्शन कंपनीने नियमांचे पालन न करता मनरेगाचे पैसे लाटले होते. एप्रिल महिन्यात प्रशासनाला या घोटाळ्याबाबत कळाले. चौकशीत कळाले की 32 कंपन्यांनी देवगड बारिया आणि धानपुर भागात सामग्री दिली होती. यापैकी कुठल्याही कंपनीने सर्वात कमी बोली लावली नव्हती आणि ही बाब नियमबाह्य होती. कुठलाही प्रकल्प सुरु झाला नव्हता पण त्याचे पैसे आधीच घेतले गेले.
या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा घोटाळा आणखी मोठा असू शकतो असा संशय विरोधी पक्षांनी व्यक्त केला आहे.





























































