बांगलादेशी कपड्यांना हिंदुस्थानी बंदराची दारे बंद, एका झटक्यात मार्ग बंद

हिंदुस्थानने व्यापार नियमांमध्ये बदल करत ईशान्येकडील भू-बंदरांमधून बांगलादेशातून फळे, कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, कापूस, प्लॅस्टिक आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी घातली. यासंदर्भात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालकांनी एक अधिसूचना नुकतीच जारी केली. अधिसूचनेनुसार, बांगलादेशातून तयार कपड्यांची आयात आता फक्त न्हावा शेवा (जवाहर बंदर) आणि कोलकाता बंदरातूनच करता येईल. इतर सर्व भू-बंदरांवरून प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मंत्रालयाने सांगितले की, अधिसूचनेद्वारे बांगलादेशमधून भारतात आयात होणाऱ्या काही वस्तू जसे की तयार कपडे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ इत्यादींवर बंदर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तथापि बांगलादेशमधून हिंदुस्थानात भूतान आणि नेपाळकडे जाणारे सामान या बंदर निर्बंधातून वगळण्यात आले आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आदेशानुसार बांगलादेशमधून तयार कपड्यांची आयात कोणत्याही भूमार्गावरील बंदरातून करता येणार नाही. ती फक्त न्हावा शेवा आणि कोलकाता या समुद्रमार्गावरील बंदरांमधूनच करता येईल.

या वस्तूंवर निर्बंध

  • फळे, कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (बेक्ड वस्तू, स्नॅक्स), कापूस, प्लॅस्टिक आणि पीव्हीसी तयार वस्तू, रंग, प्लास्टिसायझर आणि ग्रॅन्युल आदींना तसेच शेजारील देशातून येणाऱ्या वस्तू आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरममधील कोणत्याही एलसीएस (लँड कस्टम स्टेशन) व आयसीपी (इंटिग्रेटेड चेक पोस्ट) मधून येऊ देणार नाही, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
  • या बंदर निर्बंधात बांगलादेशमधून होणारी मासे, एलपीजी, खाद्यतेल आणि क्रश्ड स्टोनची आयात समाविष्ट नाही असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

कपड्यांची मोठी आयात ः बांगलादेशने 2023 मध्ये 38 अब्ज डॉलर्स किमतीचे तयार कपडे आयात केले. यापैकी 700 दशलक्ष डॉलर्स किमतीचे आयात हिंदुस्थानात झाले, त्यापैकी 93 टक्के आयात जमीन बंदरांमार्गे झाले.