इस्रोचे 101 वे मिशन फेल, पीएसएलव्ही सी-61चे प्रक्षेपण अयशस्वी

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) 101 वे मिशन फेल गेले. पीएसएलव्ही सी 61 या उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी ठरले. उड्डाणाच्या तिसऱया टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज सकाळी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण पूर्ण करण्यात इस्रोला अपयश आले.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ पेंद्रातून सकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी 101 वे प्रक्षेपण करण्यात आले. रॉकेटचे दोन टप्पे सामान्यपणे पार पडले. चार टप्प्यांच्या पीएसएलव्ही वाहनाची दुसऱया टप्प्यापर्यंत कामगिरी सामान्य होती; परंतु तिसऱ्या टप्प्यात काही विसंगती आढळल्या. त्यामुळे मोहीम पूर्ण होऊ शकली नाही असे दिसून आल्याचे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले. मोहिमेचे विश्लेषण करू आणि पुन्हा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.