
मुंबई महापालिकेकडून मालाडच्या मढमधील अतिक्रमण करून तसेच खोटे नकाशे सादर करून बांधलेल्या बंगले आणि घरांवर तोडक कारवाई सुरू आहे. यात आता प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या बंगल्यालाही नोटीस देण्यात आली आहे. मिथुन यांच्या एरंगळ येथील बंगल्यातील काही भाग हा अनधिकृत असल्याचा दावा पालिकेने त्यांना पाठवलेल्या नोटिसीत केला आहे. या नोटिसीला सात दिवसांत उत्तर दिले नाही तर बंगल्यावर कारवाई केली जाईल, असा पालिकेने म्हटले आहे.
मुंबई महापालिकेकडून मालाड येथील मढ परिसरातील एरंगळ आणि वलनाई या गावात अनधिकृत बंगले आणि बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 101 बंगले आणि अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात आता मिथुन यांच्या बंगल्यातील काही भागावर पालिकेने आक्षेप घेतला असून त्याबाबत नोटीस बजावली आहे.
मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम 351(1A) अंतर्गत 10 मे रोजी ही नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार, मिथुन यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्या दरम्यान त्यांनी हे बांधकाम कायदेशीर असल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. जर त्यांनी यासाठी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही, तर बीएमसी हे बांधकाम पाडण्याची तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्याची शक्यता आहे. दरम्यान, माझ्या बंगल्याचे बांधकाम पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा मिथुन यांनी केला आहे.