
सोने तस्करी करणाऱ्या दोघांना सीमा शुल्क विभागाने अटक केली. नितीन इंगले आणि हर्षल खरात अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांकडून 5 कोटींचे सोने जप्त केले. ते दोघे विमानतळावर पंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात. कपडय़ातून सोने बाहेर घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करत होते. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी घेण्यात आली आहे. काही परदेशातील तस्कर हे सोने तस्करीसाठी विविध आयडिया शोधून काढतात. त्यामुळे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने विमानतळावर विशेष लक्ष केंद्रित केले. शनिवारी नितीन हा विमानतळाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला सीमा शुल्क अधिकाऱ्याने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या जॅकेटची तपासणी केली. त्यात 2 किलो 947 ग्रॅम मेण स्वरूपात सोने होते. त्याची किंमत सुमारे 2 कोटी 48 लाख रुपये इतकी आहे. या कारवाईदरम्यान सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने हर्षल खरातला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनदेखील 2 कोटी 62 लाखांचे मेण स्वरूपातील सोने जप्त केले.