टेंडर भरून मोक्याच्या पोस्टिंग मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा दणका, 70 कार्यक्षम निरीक्षकांना न्याय मिळाला

मुंबई पोलीस दलातील 70 हून अधिक वरिष्ठ व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी पोलीस पत्रकाद्वारे जारी करण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणात सेवाज्येष्ठता व गुणवत्ता हा निकष लावण्यात आल्याचे मुंबई पोलीस दलात बोलले जात आहे. धडाडीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी टेंडर भरून मोक्याच्या पोस्टिंग मिळविणाऱ्या पोलीस निरीक्षकांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना दणका दिला आहे, असे पोलीस दलात बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंडर भरून ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, पुणे आदी पोलीस आयुक्त दलातील अधिकाऱ्यांनी मुंबईतील मोक्याच्या पोस्टिंग मिळविल्या होत्या. त्यापैकी बहुसंख्य अकार्यक्षम पोलीस निरीक्षकांची मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पोलीस ठाण्यातून उचलबांगडी केली आहे व ज्यांचा कुणी वाली नाही, गॉडफादर नाही अशा गुणवंत व कार्यक्षम निरीक्षकांना पोलीस ठाण्यात काम करायची संधी दिली आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून काही निरीक्षकांनी आपल्या वरिष्ठांना व सहकाऱ्यांना एसएमएस करून त्यांचे आभार मानले आहेत.

एक पोलीस निरीक्षक आपल्या संदेशात म्हणतो, नवीन सीपी सरांनी आम्हाला न्याय दिला. आमची कुठेही ओळख नव्हती; परंतु माननीय सीपी सरांनी गुणवत्ता व सीनियॅरिटीला अजून किंमत आहे हे साऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाला दाखवून दिले आहे. अशा भावना काही निरीक्षकांनी व्यक्त करून पोलीस आयुक्त देवेन भारती यांचे आभार मानले आहेत.