बेकायदा कंटेनर कार्यालयावरून मिंधे-भाजपमध्ये लेटरवॉर; शिंदेंना पत्र पाठवून मेहतांविरोधात तक्रार

मिंधे गटाने मोक्याच्या जागा अडवत मीरा-भाईंदरमध्ये तब्बल 16 कंटेनर कार्यालये उभी केली आहेत. मात्र पालिका अधिकारी कानाडोळा करत असल्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनीदेखील पालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोरच कंटेनर कार्यालय सुरू केले आहे. इतकेच नाही तर आधी शिंदे गटाच्या कार्यालयांवर कारवाई करा, असे आव्हानच आयुक्तांना दिले आहे. यानंतर पालिका प्रशासनाने नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तंतरलेल्या मिंधे गटाने मेहता यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत तक्रार केली आहे. या लेटरवॉरमुळे आगामी काळात भाजप-मिंध्यांमध्ये चांगलीच जुंपणार असल्याचे दिसत आहे.

सत्ता आणि पैशाच्या जोरावर मिंधे गटाने संपूर्ण राज्यात उच्छाद मांडला आहे. भाईंदरमधील भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पालिकेतील सद्दी उलथवून टाकण्यासाठी मिंध्यांनी हर प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. याकरिता शहरातील मोक्याचे फुटपाथ अडवत त्याठिकाणी भलेमोठे कंटेनर कार्यालय सुरू केले आहेत. एक, दोन नव्हे तर तब्बल 16 ठिकाणी या कार्यालयांच्या नावाखाली नागरिकांचा रस्ता अडवण्यात आला आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी अनेकदा तक्रार करूनही पालिका प्रशासन नगरविकास विभागाच्या ‘दबावा’मुळे कारवाई करण्यास घाबरत आहे. नरेंद्र मेहता यांनीदेखील याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. परंतु काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी थेट पालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोरच भाजपचे पहिले कंटेनर कार्यालय सुरू केले आहे.

तंट्यामागे पालिका निवडणुकीचे राजकारण
काही महिन्यांत महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाईंदरमधील मेहतांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक छुप्या पद्धतीने प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. याच राजकारणातून १६ कंटेनर कार्यालये सुरू करण्यात आली असून भाजपपेक्षा आम्ही कसे तुमच्या उपयोगाचे आहोत हे मतदारांवर बिंबवण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत. मिंध्यांचा हा डाव मेहतांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी जाणीवपूर्वक पालिका आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर भाजपचे कार्यालय सुरू करून पालिका प्रशासनाला आव्हान दिले आहे.

मेहतांचीही पोलखोल करा !
मिंधे गटाचे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांनी एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिले आहे. भाजपच्या दबावाखाली पालिका आपल्या कार्यालयांवर कारवाई करणार असेल तर मेहतांच्या कृत्यांचीदेखील पोलखोल होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केल्याचे समजते.