
झाडाखाली उभे राहत असाल तर सावधान, ठाणेकरांनो… कारण रिक्षावर झाड पडून एकाचा मृत्यू आणि एकजण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज स्टेशन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात झाड पडून दोनजण जखमी झाले आहेत. वारंवार झाडे पडण्याच्या घटनांमुळे महापालिकेच्या फांद्या छाटण्याच्या मोहिमेचा पुरता फज्जा उडाला असून ही मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे दरम्यान झाडांच्या फांद्या छाटणी मोहिमेसाठी लागणारे लाखो रुपये गेले कुठे, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
स्टेशन रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात एक भलेमोठे झाड आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोसळले. या घटनेत दिलीप गुप्ता (35) आणि सुनील गौड (48) हे दोनजण जखमी झाले असून दोघांना उपचारार्थ कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाहक बळी जात असेल तर जबाबदार कोण ?
पावसाळ्यात कोणती दुर्घटना घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिकेने दोन महिने आधी ठाण्यातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण केले असल्याचा दावा पालिकेने केला. याशिवाय फांद्या छाटण्याची मोहीमदेखील घेण्यात आली. मात्र ठाण्यात झाडे उन्मळून पडण्याचा घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान यामध्ये नागरिकांचा नाहक बळी किंवा अनेक जण जखमी होत असून याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.