
सर्व नियम धाब्यावर बसवून मोखाडा आणि खोडाळा बाजारपेठेतील शासकीय जमिनीवर उभारलेल्या बांधकामांवर लवकरच हातोडा पडणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडीच्या कटकटीतून मोखाडावासीयांची कायमची सुटका होणार आहे. अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तीनवेळा नोटिसा बजावूनही बेकायदा बांधकामे न हटवल्यास अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.
मोखाडा तालुक्यात मोखाडा आणि खोडाळा या दोन मुख्य बाजारपेठा आहेत. खोडाळा बाजारपेठ पालघर-वाडा- देवगाव राज्यमार्ग क्रमांक 34 आणि मोखाडा-खोडाळा- विहीगाव राज्यमार्ग क्रमांक 78 च्या चौफुलीवर वसलेली आहे. तर मोखाडा बाजारपेठेचे प्रवेशद्वार राज्यमार्ग क्रमांक 78 वर आहे. या दोन्ही ठिकाणी सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजारपेठेत मोठी वाहतूककोंडी होत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे. एकाचवेळी दोन वाहने या रोडवरून जाऊ शकत नाहीत.
रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले
खोडाळा बाजारपेठेतून जाणाऱ्या पालघर-वाडा-देवगाव या राज्य मार्गाचे रुंदीकरण करण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली असून या कामाचे कार्यादेशदेखील देण्यात आले आहेत. मात्र या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे रुंदीकरणाचे काम रखडल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.
खोडाळा बाजारपेठेतील रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या 128 नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर मोखाड्यातील बस स्थानकजवळची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी 102 नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत. नियमानुसार तीन नोटिसा देऊन ही संबंधितांनी अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमणांवर हातोडा चालवून खर्चाची वसुली करणार आहे. पावसाळा सरताच ही कारवाई तातडीने करण्यात येणार आहे.
विशाल अहिरराव, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.