
जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. त्यामुळे या कालावधीत 1 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. मार्च 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना एकूण 13 हजार 819 कोटी रुपये अद्याप वाटप होणे बाकी आहे. पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर सरकार पीक विम्याची एकदाच भरपाई देणार आहे, हे अन्यायकारक असून याविरोधात आवाज उचलणार असल्याचे दानवे म्हणाले.
गेल्या काही दिवसात राज्यातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
सोलापूर एमआयडीसीत लागलेल्या आगीत जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी पंढरपूर हुन रूग्णवाहिका आणावी लागली, यावरून दानवे यांनी राज्यातील एकूण एमआयडीसींच्या सुरक्षा व उपाययोजनांबाबत ताशेरे ओढले. जनतेचा विरोध असताना ही विविध विकासकामांच्या नावाखाली सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठया प्रमाणात सुरू असून गुत्तेदारांच साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या राजशिष्टाचारात निष्काळजीपणा केला व त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर सरकारने पत्रक काढलं. या चुकीवर पांघरूण घालून चालणार नाही,चुकीला माफी नाही असे म्हणत विरोधी पक्ष म्हणून आम्ही याविरोधात भूमिका घेऊ असे दानवे म्हणाले.































































