
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला मदत करणाऱ्या, तुर्की कंपन्यांवर बंदी घातली आहे. याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड हॅन्डलिंगचे काम करणाऱ्या, तुर्कीच्या ‘सेलेबी नास’ कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आला. त्यामुळे कंपनीतील 3700 कामगारांवर बेरोजगारीची नामुष्की ओढवलीय. पण भारतीय कामगार सेनेने पुढाकार घेत, इंडो थाई कंपनीत या कामगारांना सामावून घेतले.
याच पार्श्वभूमीवर भारतीय कामगार सेनेतील सदस्यांनी आणि कामगारांनी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी या सर्व कामगारांना दिलासा देत, कामगारांसोबत सदैव उभे राहू; असे आश्वासित केले. यावेळी शिवसेना नेते-खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस संजय कदम तसेच भारतीय कामगार सेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.