
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलल्याने तृणमूल काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. पाऊस फक्त बहाणा आहे. हा एक कट असून राजकीय कारणांमुळे सामन्याचे ठिकाण बदलण्यात आल्याचा आरोप पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमधील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आयपीएल 2025 चा फायनल सामना खेळवला जाणार होता. मात्र बीसीसीआयने अचानक अंतिम सामन्याचे ठिकाण बदलले. ईडन गार्डन्स स्टेडियमऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल, असे बीसीसीआयने घोषित केले. यानंतर बंगालमधील राजकारण तापले आहे. बंगालधील क्रिकेटप्रेमींना वंचित का ठेवले जात आहे? असा सवाल अरुप बिस्वास यांनी उपस्थित केला.
सुरक्षेचे कारण देत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केल्याने अरुप बिस्वास यांनी मजुमदार यांना प्रत्युत्तर दिले आहे. अरुप बिस्वास म्हणाले की, “सुकांता मजुमदार यांनी ट्विट केले की सुरक्षेच्या कारणास्तव अंतिम सामना हलवण्यात आला आहे, तर बीसीसीआय म्हणते की हा निर्णय खराब हवामानामुळे घेण्यात आला आहे.”
केंद्रीय राज्यमंत्री आणि पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी अरुण बिस्वास यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. मजुमदार यांनी आयपीएल सामन्याचे ठिकाण बदलण्यास ममता बॅनर्जी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आयपीएल अंतिम सामन्याचे ठिकाण बदलणे हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कुशासनाचा आणखी एक सबळ पुरावा आहे. बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, कोलमडलेली प्रशासकीय रचना आणि राजकीय अक्षमता यामुळे आयपीएल अंतिम सामन्याचे ठिकाण बदलल्याचे मजुमदार यांनी सांगितले.
गुजरातमध्ये राज्यात सुशासन आणि पायाभूत सुविधा आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये सर्व काही घडत आहे. पश्चिम बंगालमध्ये फक्त तुष्टीकरण आणि घाणेरडे राजकारण सुरू आहे, असेही मजुमदार पुढे म्हणाले.