म्हातारी निबर, कवटाळी जबर

>> साधना गोरे, [email protected]

परवा बाजारात भाजी घेताना भाजीवाला ‘‘भेंडी घ्या’’ म्हणून आग्रह करायला लागला. त्याला म्हटलं, “दादा, भेंडी खूप निबर दिसतेय, त्यापेक्षा मला वांगी द्या.’’ तरी तो भेंडी कशी चांगली आहे, ती पण घ्या सांगत राहिला. मी म्हटलं, “दादा, भेंडी खूप कडक आहे. आता नका देऊ. तर त्याने दोन भेंडय़ांचे शेंडे तोंडून ती कशी कडक नाही याचं मला प्रात्यक्षिकच दिलं. आता या उत्तर भारतीय माणसाला निबर म्हणजे कसं सांगायचं मनात सुरू असतानाच तोंडात आलं, “दादा, भेंडी खूप जुनी आहे, म्हणजे कडी कडी आहे.’’ माझं म्हणणं त्याच्यापर्यंत पोहोचलं की नाही, माहीत नाही, पण त्याने भेंडी घेण्याचा आग्रह थांबवला खरा आणि वांगी देऊ केली.

‘निबर’ या प्रमाण शब्दाचं बोलीतलं किंवा ग्रामीण भागातलं रूप म्हणजे निबार. व्याकरणाच्या भाषेत सांगायचं तर ‘निबर’ हे विशेषण आहे आणि ते अनेक अर्थांनी वापरलं जातं. शब्दकोशात या शब्दाचे जुना, कठीण, मजबूत, घट्ट, टणक, राठ, कोरडा, वृद्ध, म्हातारा, प्रखर, तीव्र, चिवट असे विविध अर्थ दिलेले आहेत. निबर म्हणजे कोवळेपण, नाजूकपण संपलेली अवस्था. जून झालेल्या फळाला, भाजीला, झाडाला निबर म्हटलं जातंच, पण मनुष्यालाही म्हटलं जातं. विशेषतः लग्नाचं वय उलटून गेलेल्या व्यक्तीच्या दिसण्याबद्दल हे विशेषण वापरलं जातं. त्यासाठी ‘निबरवया’ असा स्वतंत्र शब्दही आहे. कडक स्वभावाच्या, मनाच्या माणसाला ‘निबर काळजाचा’ म्हटलं जातं. निबरट, निबरढोण अशीही रूपं वापरली जातात. यातलं ‘ढोण’ हे धोंड शब्दाचं अपभ्रंश रूप आहे. धोंडय़ादगडासारखा कठीणपणा त्यातून अभिप्रेत आहे. खूप क्षार असलेल्या पाण्याला कठीण पाणी म्हणतात, पण गावाकडे निबर पाणी असंही म्हटलं जातं.

‘व्युत्पत्तिकोशा’च्या पुरवणी आवृत्तीमध्ये कृ. पां. कुलकर्णी म्हणतात की, हा ‘निबर’ शब्द कानडीतील ‘निब्बर’पासून मराठीत आला. कानडीत त्याचा अर्थ आहे परिपूर्ण, भरलेले, जड, सहज मोडणारे, सहज फुटणारे, अधिक. यांतील ‘अधिक’ या अर्थाशिवाय इतर अर्थ एखाद्या गोष्टीची परिपक्व अवस्था दर्शवितात. अधिक, खूप या अर्थाने हा ‘निबर’ शब्द आज प्रमाण मराठीत अजिबात वापरला जात नाही, पण ग्रामीण भागात या अर्थाने त्याचा सर्रास वापर केला जातो. उदा. निबार ऊन पडलंय, निबार पाऊस झाला, निबार पीक आलंय. तसंच त्याला खूप मारलं या अर्थाने ‘त्याला निबार हाणला’ म्हटलं जातं. कृ. पां. कुलकर्णी, वि. का. राजवाडे आणि इतर अनेक कोशकारांनी या ‘निबर’ शब्दाचं मूळ संस्कृतमधील ‘निर्भर’ शब्दात असल्याचं म्हटलं आहे. ‘निर्भर’चा अर्थ आहे अतिशय, गाढ, पूर्ण, भरलेला. त्यामुळे या मूळ द्राविडी शब्दाचं नंतर संस्कृतीकरण झालं की हा मूळ संस्कृत शब्द नंतर कन्नडसारख्या द्राविडी भाषेने स्वीकारला आणि तिथून तो मराठीत आला, हे कळायला मार्ग नाही, पण मराठी व कोकणीशिवाय इतर आर्य भारतीय भाषांमध्ये हा शब्द आढळत नाही.

अनेक संतांनी आपल्या अभंग-ओव्यांमध्ये हा ‘निबर’ शब्द वापरला आहे. तसंच या शब्दावरून काही अर्थपूर्ण म्हणीही आहेत. म्हातारपणात शरीर, मन, अनुभव सगळंच पक्व झालेलं असतं, पण तरीही पक्वतेनुसार काही वृद्ध व्यक्तींमध्ये निरिच्छ वृत्ती अंगी आलेली असतेच असं नाही. उलट, वस्तू, गोष्टी धरून ठेवण्याची वृत्ती वाढलेली असते. या अर्थाने ‘म्हातारी निबर, कवटाळी जबर’ ही म्हण वापरली जाते.

प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी वाटतं की, आपल्याच वाटय़ाला काय ते वाईट आलं आहे, इतरांचं कसं सगळं छान, सुरेख आहे. हा मनुष्य स्वभाव अधोरेखित करणारी एक कोकणी म्हण आहे – ‘हांव खाता तां निबार, दादा खातां तां मऊ’. म्हणजे, मी खातो आहे ते निबर आहे आणि दादा खातो ते मऊ आहे.

समाजाची जीवनशैली बदलली की, त्या संदर्भातले शब्द मागे पडणं स्वाभाविक आहे. आपल्या कृषीप्रधान देशात औद्योगिकीकरण वाढत गेलं तसतसं त्या संदर्भातले शब्द, म्हणी, वाक्प्रचारही मागे पडत गेले, पण बऱ्याचदा असं ठोस काही कारण नसतानाही कितीतरी शब्द भाषेत वापरलेच जात नाहीत किंवा त्यांचा वापर मर्यादित अर्थाने व्हायला लागतो. या ‘निबर’ शब्दाचंही काहीसं तसंच झालेलं दिसतं. बरं तर, तुम्ही हा ‘निबर’ शब्द वापरता का आणि नेमका कोणत्या संदर्भात वापरता?