
मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांपुरती मर्यादित असलेली अकरावीची केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदापासून राज्यातील ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांनाही लागू करण्यात आली आहे. आधी हे प्रवेश त्या-त्या विभागीय शिक्षण संचालकांकडून होत. आता त्याचे केंद्रीकरण पुण्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे करण्यात आले आहे, परंतु अकरावी ऑनलाइनचा गेल्या दोन दिवसांत उडालेला पुरता बोजवारा पाहता केवळ प्रवेशच नव्हे तर विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्षच टांगणीवर असल्याचे दिसून येत आहे. याविषयी विद्यार्थी समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांच्याशी केलेली ही बातचीत.
– ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याची गरज होती का?
शहरी भागात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रूजलेली आहे. तरीही प्रवेश प्रक्रिया लांबते आणि विद्यार्थी-पालकांना प्रचंड मनस्तापातून जावे लागते. ग्रामीण भागात तर याची गरजच नव्हती. तिथे का@लेजचे पर्याय मर्यादित असतात. तरीही त्यांना हा ऑनलाइनचा खटाटोप करावा लागणार आहे. त्यात मुलांना मार्गदर्शन करणारे पुणी नसते. हा गोंधळ आणखी काही काळ सुरू राहिला तर विद्यार्थ्यांचे वर्षच टांगणीला लागणार आहे.
– तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर तरी प्रवेशाची गाडी रुळावर येईल असे वाटते का?
कुठेही न जाता घरबसल्या प्रवेश घ्या ही गोष्ट ऐकायला चांगली वाटते, परंतु मुंबईसारख्या शहरांतही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून जाताना विद्यार्थी-पालक मेटाकुटीला येतात. त्यात येणाऱ्या तांत्रिक किंवा अन्य अडचणींना सरकारी यंत्रणेकरून योग्य मार्गदर्शन मिळत नाही. फोन, ई-मेलला नीट उत्तर मिळत नाही. प्रवेशही ऑगस्टपर्यंत लांबून काॉलेजेस उशिरा सुरू होतात, हे चित्र यंदा सार्वत्रिक असेल.
– ऑनलाइन प्रवेशाकरिता शालेय शिक्षण विभागाची यंत्रणा सक्षम नव्हती असे वाटते का?
यंदा 16 ते 17 लाख विद्यार्थी एकाचवेळी प्रवेशाच्या पोर्टलवर आले. इतका भार झेलण्याकरिता पोर्टलला तांत्रिकदृष्टय़ा सक्षम करायला हवे होते, परंतु ते झालेले नाही.
– शिक्षकांकडून विरोध का?
ऑनलाइन प्रवेशाकरिता अनेक शिक्षक उन्हाळ्याची सुट्टी सोडून कामावर रुजू झाले आहेत. त्यांचे तर यामुळे चांगलेच हाल झाले आहेत. शिवाय या गोंधळामुळे कामासाठी पूर्ण वेळ देऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही आहे.