म्हाडाच्या 6248 घरांच्या किमती एक ते दीड लाखांनी कमी झाल्या; खोणी, शिरढोणमधील विजेत्यांना दिलासा

म्हाडाच्या कोकण मंडळाने गेल्या वर्षी काढलेल्या सोडतीमधील शिरढोण आणि खोणी येथील विजेत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येथील 6248 घरांच्या विक्री किमती एक ते दीड लाख रुपयांनी कमी करण्यात आल्या असून विजेत्यांना दिलासा मिळणार आहे.

कोकण मंडळाने गेल्या वर्षी ऑक्टोबरला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर खोणी आणि शिरढोण येथील घरांसाठी सोडत काढली होती. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी कल्याणमधील शिरढोण येथील घरांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावास मान्यता दिली असून येथील 5236 घरांची विक्री किंमत प्रति सदनिका 1 लाख 43 हजार 404 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे या घरांची सुधारित विक्री किंमत आता 19 लाख 28 हजार 742 रुपये असणार आहे. तसेच मौजे खोणी येथील 1012 घरांची विक्री किंमत प्रति सदनिका 1 लाख 1 हजार 800 रुपयांनी कमी करण्यात आली असून आता या घरांची सुधारित किंमत 19 लाख 11 हजार 700 रुपये असणार आहे. पात्र लाभार्थ्यांना या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.