टेस्लाच्या सीएफओला 11,95,20,06,911 रुपये पगार, वैभव तनेजा यांनी सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई यांना टाकले मागे

टेस्ला कंपनीत सीएफओ म्हणून कार्यरत असलेले मूळचे हिंदुस्थानी वैभव तनेजा सध्या भरमसाट मिळणाऱ्या पगारावरून चर्चेत आले आहेत. वैभव तनेजा हे जगातील सर्वात जास्त पगार मिळवणारे सीएफओ बनले आहेत. 2024 मध्ये तनेजा यांना 139.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 11,95,20,06,911 रुपये पगार मिळाला आहे. त्यांचा हा पगार मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापेक्षा जास्त आहे.

गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने 2024 मध्ये सुंदर पिचाई यांना 10.73 मिलियन डॉलर्स पगार दिला आहे, तर मायक्रोसॉफ्टने नाडेला यांना 79.1 मिलियन डॉलर पगार दिला आहे. वैभव तनेजा यांची बेसिक सॅलरी 400,000 डॉलर आहे, परंतु स्टॉक ऑप्शन्स आणि इक्विटी अवॉर्डस्मधून त्यांना बाकीचा पैसा मिळाला आहे. तनेजा कॉर्पोरेटमध्ये सर्वात जास्त पगार मिळवणारे फायनान्स एक्झिक्युटिव्ह बनले आहेत. वैभव तनेजा यांना 139.5 मिलियन डॉलरचे वेतन स्टॉकच्या रूपात मिळाले आहे. हे स्टॉक त्यांना चार वर्षांपर्यंत मिळणार आहे.

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण

वैभव तनेजा यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. 1999 मध्ये कॉमर्समध्ये पदवी मिळाल्यानंतर त्यांनी 2000 मध्ये इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियामधून चार्टर्ड अकाऊंटची पदवी मिळवली. 2006 मध्ये अमेरिकेत सर्टिफाइड पब्लिक अकाऊंटेंटची डिग्री मिळवली. तनेजा यांनी 17 वर्षांपर्यंत हिंदुस्थान आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी काम केले आहे. 2016 मध्ये सोलरसिटी नावाच्या कंपनीत काम केले. 2017 मध्ये या कंपनीची टेस्ला कंपनीत विलीनीकरण झाल्यानंतर तनेजा टेस्लामध्ये असिस्टेंट कॉर्पोरेट कंट्रोलर बनले. 2018 मध्ये कॉर्पोरेट कंट्रोलर बनले, तर 2019 मध्ये चीफ अकाऊंट ऑफिसर बनले. 2023 मध्ये त्यांना कंपनीने सीएफओ बनवले. तनेजा हे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालकसुद्धा आहेत.