कतार अमेरिकेवर मेहेरबान! डोनाल्ड ट्रम्प यांना 3400 कोटींचे विमान भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कतार दौऱ्यावर गेले असताना कतारच्या राजाने अमेरिकेला बोइंग 747-8 हे जम्बो जेट विमान भेट म्हणून दिले आहे. या विमानाची किंमत तब्बल 3 हजार 400 कोटी रुपये इतकी आहे. या आलिशान विमानाला ‘फ्लाइंग पॅलेस’ असे म्हणतात. कोणत्याही अमेरिकन राष्ट्रपतींना मिळालेली ही सर्वात महागडी भेट आहे. हे विमान डोनाल्ड ट्रम्प यांना भेट म्हणून दिले असले तरी त्यांना ते लगेच वापरता येणार नाही. अमेरिकेतील सुरक्षा एजन्सीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हे विमान वापरता येईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी कतार दौऱ्यावेळी कतार सरकारसोबत जवळपास शंभर लाख कोटी म्हणजेच 1.2 ट्रिलियन डॉलर्सचा करार केला आहे. त्यामुळे या लक्झरी विमानाकडे लाच म्हणूनसुद्धा पाहिले जात आहे. ट्रम्प यांच्या कंपनीने कतारमध्ये नवीन गोल्फ रिसॉर्टची घोषणा केलीय. कतार सरकारच्या मालकीची ही पंपनी आहे. त्यामुळे या भेटवस्तूकडे लाच किंवा व्याज म्हणूनही पाहिले जात आहे, परंतु ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे हे विमान स्वीकारले नाही तर आपण मूर्ख ठरू असे म्हटले होते.

विमानात कोणत्या सुविधा

ट्रम्प यांना भेट म्हणून दिलेले ‘फ्लाइंग पॅलेस’ असलेले बोइंग 747-8 हे विमान लक्झरी आणि अत्याधुनिक टेक्नोलॉजीसाठी प्रसिद्ध आहे. या विमानात 40 ते 100 व्हीआयपी प्रवाशांसाठी कॉन्फिगरेशनमध्ये लक्झरी सुइट्स दिले आहेत. यात मास्टर बेडरूम, कॉन्फरन्स रूम, डायनिंग एरिया, लाऊंज आणि बाथरूमसारख्या सुविधा आहेत. या विमानात चार जेनरेक्स-टूबी टर्बोफॅन इंजिन दिले आहेत. अत्याधुनिक काचेचे कॉकपिट आणि नेव्हिगेशन सिस्टम दिला आहे. यामुळे क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करण्यासाठी इन्फ्रारेड जॅमर बसवण्यात आली आहेत. लाऊंज आणि डायनिंग एरियामध्ये मोठे डायनिंग टेबल, हाय-टेक स्क्रीन, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, ब्लू-रे प्लेयर्स आणि उच्च दर्जाची ऑडिओ सिस्टम आहेत.

भेटवस्तू सरकारी तिजोरीत जमा

जगातील अनेक देशांमध्ये परदेशी भेटवस्तू मिळाल्या की, त्या सरकारी तिजोरीत जमा करण्याची पद्धत आहे. सरकारी नियमांनुसार सूट मिळाल्याशिवाय नेते आणि सरकारी अधिकारी त्यांचा वैयक्तिक वापरासाठी वापर करू शकत नाहीत. अमेरिकेत 41 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू राष्ट्रीय अभिलेखागारात जमा करण्याचा नियम आहे. ट्रम्प एअर फोर्स वनला पर्याय म्हणून तात्पुरते हे विमान वापरतील. एअर फोर्स वन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत विमान आहे.