
जुन्या शर्टप्रमाणेच नवीन शर्ट शिवण्यात यावे, असे सांगूनही टेलरने मापाचा शर्ट शिवला नाही. त्यामुळे संतापलेल्या एका ग्राहकांना टेलरला थेट ग्राहक न्यायालयात खेचले. ग्राहक न्यायालयाने ग्राहकाच्या तक्रारीवरून दुकानदाराला नुकसानभरपाई म्हणून 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना केरळमधील एर्नाकुलम जिह्यात घडली आहे.
केरळमधील थ्रिक्काकारा येथील थॉमस जिमी यांनी पलारीट्टोममधील एका शिलाई दुकानदाराकडे नवीन शर्ट शिवायला टाकला होता. यासाठी थॉमस यांनी आपला जुना शर्ट मापासाठी दिला होता. जुन्या शर्टप्रमाणे नवीन शर्ट शिवण्यात यावा असेही शिंप्याला सांगितले होते, परंतु थॉमस यांना जेव्हा नवीन शर्ट मिळाला, त्यावेळी तो योग्य मापात शिवला नव्हता.
टेलरच्या चुकीमुळे आपल्याला झालेले आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाची भरपाई मिळावी, अशी विनंती थॉमस यांनी ग्राहक न्यायालयाकडे केली. स्पष्ट सूचना आणि योग्य पैसे देऊनही टेलर योग्य सेवा पुरवण्यात अयशस्वी झालेला दिसत आहे. टेलरला 12,350 रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. या दंडाच्या रकमेत 550 रुपये शिलाई शुल्क, 1800 रुपयांच्या कापडाची किंमत आणि न्यायालयीन खर्चासाठी 5 हजारांचा खर्च याचा समावेश आहे, असे ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे.