चंद्रपुरातील नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद, 12 दिवसांत घेतला 9 जणांचा बळी

चंदपूर जिह्यात हैदोस घालून तब्बल 9 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तळोधी परिसरातून या वाघिणीला पकडण्यात आले. वनखात्याच्या पथकासह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शूटर अजय मराठे यांनी आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाघिणीला बेशुद्ध करून पकडले. या वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात येणार आहे.

नागभीड तालुक्यातील तळोधी बा वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीटमधील कक्ष क्रमांक 697 मध्ये रविवारी वाढोणा येथील मारोती नकडू शेंडे हा इसम आपली पत्नी व अन्य नागरिकांसह सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी सकाळी गेला होता. तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या वाघिणीने त्याच्यावर मागून हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला नकडू शेंडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • 11 मे रोजी मूल तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे ही महिला चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील 537 कंपार्टमेंटमध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली असता वाघिणीच्या हल्ल्यात ठार झाली.
  • 12 मे रोजी मूल तालुक्यात वडीलांकडे राहत असलेल्या भादुर्णा येथील भूमिका दिपक भेंडारे हिचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
  • 14 मे रोजी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथे कचराबाई अरुण भरडे (54) ही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. वाघिणीने तिला ठार केले.
  • रविवार 18 मे रोजी नागभीड व मूल तालुक्यात दोघांचा वाघिणीने बळी घेतला. मूल तालुक्यातील भादुर्णी येथील ऋषी झुगांजी पेंदोर (70) यांनाही वाघिणीने ठार केले होते.