पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्षाच्या पत्नीकडे दोन व्होटर आयडी

केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांच्या पत्नी कोयल मजुमदार यांच्याकडे दोन व्होटर आयडी असल्याच्या तक्रारीची निवडणूक आयोग चौकशी करत आहे. कोयल यांच्याकडे बालूरघाट आणि जलपायगुडी या दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणीकृत मतदान कार्ड असल्याचे प्राथमिक तपासात आढळले. वेगवेगळे ‘ईपीक’ क्रमांक असलेले दोन व्होटर आयडी होते. कोयल यांचे पती सुकांता मजुमदार हे बालूरघाटचे खासदार आहेत.

एक मतदान कार्ड त्यांच्या पहिल्या नावाने कोयल चौधरी तर दुसरे मतदान कार्ड त्यांच्या लग्नानंतर कोयल मजुमदार या नावाने नोंदणीकृत आहे. जर त्यांनी फॉर्म 18 सादर करून माहिती दिली असती तर हे टाळता आले असते. कोणत्याही बदलांची माहिती निवडणूक आयोगाला देणे ही मतदाराची जबाबदारी आहे. या प्रकरणात आयोगाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असे आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.