हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण ढासळलेले; ट्रम्प यांना मध्यस्थी करण्यास कुणी सांगितले? राहुल गांधी यांचा एस. जयशंकर यांना सवाल

हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे ढासळलेले असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच हिंदुस्थानला पाकिस्तानशी जोडण्याचे कारण काय आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दक्षिण आशियातील या शेजारी राष्ट्रांच्या प्रकरणात मध्यस्थी करण्यास कुणी सांगितले, असे सवालही त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केले आहेत.

या प्रकरणी राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून पोस्ट केली असून ही पोस्ट त्यांनी जयशंकर यांनाही टॅग केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. याबाबत जयशंकर यांनी डच ब्रॉडकास्टर एनओएसला मुलाखत दिली. यावरून राहुल गांधी यांनी जयशंकर यांना धारेवर धरले असून अनेक सवाल केले आहेत. हिंदुस्थानला पाकिस्तानशी का जोडले जात आहे? पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी एकही देश आपल्या मागे का उभा राहिला नाही? ट्रम्प यांना दोन्ही देशांत मध्यस्थी करण्यास कुणी सांगितले, असे अनेक सवाल राहुल गांधी केले असून पोस्टसोबत त्यांनी जयशंकर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओदेखील जोडला आहे.

मोदींनी हिंदुस्थानच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुस्थानच्या प्रतिष्ठेशी तडजोड केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी गुरुवारी केला होता. त्यानंतर आज त्यांनी जयशंकर यांना अनेक सवाल केले. मोदींनी तडजोड करून पाकिस्तानविरोधातील लष्करी कारवाई थांबवण्यासाठी का मान्यता दिली, असा सवालही राहुल गांधी यांनी मोदींना केला आहे.

जे. जे. म्हणजे जयचंद जयशंकर – काँग्रेस

काँग्रेसने ‘एक्स’वरून जयशंकर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करून राहुल गांधी यांनी जयशंकर यांना संबोधलेला जे.जे. हा शब्द म्हणजे जयचंद जयशंकर आहे असे म्हटले आहे. मुलाखतीत जयशंकर यांची बोबडी का वळत आहे, असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे. पृथ्वीराज रासो यांच्या कवितेत जयचंद यांचा उल्लेख आढळतो. राजपूत शासक जयचंदने पृथ्वीराज चौहान यांच्याविरोधात मोहम्मद घोरीला मदत केली होती याची आठवण काँग्रेसने करून दिली आहे. जयचंद जयशंकर यांनी हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली असून त्यांना तत्काळ पदावरून हटवावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.