
‘अमेरिकेतील प्रतिष्ठित सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (सीयूएनवाय)’ने नुकत्याच स्थापन झालेल्या संशोधन संस्थेला अच्युत सामंत यांचे नाव देण्यात आले आहे. ’अच्युत सामंत इंडिया इनिशिएटिव्ह सीयूएनवाय क्रेस्ट इन्स्टिट्यूट’ (एएसआयआयसीसीआय) असे नाव असलेल्या या संस्थेचे नुकतेच उद्घाटन झाले. यावेळी डॉ. अच्युत सामंत यांच्यासह अमेरिकेतील अनेक शिक्षणतज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, अमेरिकेसारख्या देशात आपल्या नावाने संस्था उभी राहणे हा आम्हा सर्वांसाठी गौरवाचा क्षण आहे. हा हिंदुस्थानी शिक्षणसेवा क्षेत्राचा मोठा विजय आहे, अशी भावना डॉ. अच्युत सामंत यांनी व्यक्त केली.
एखाद्या हिंदुस्थानी व्यक्तीच्या नावाने संस्थेची स्थापना होणे हा बहुमान पहिल्यांदाच मिळत आहे. या उपक्रमामुळे अमेरिकेतील विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी विशेषतः ओदिशाची कला, सांस्कृतिक वारसा, आदिवासी विकास आणि शिक्षण क्षेत्राचा आणि त्यात डॉ. सामंत यांच्या योगदानावर सखोल संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. ’सीयूएनवाय’ला संलग्न असलेल्या ब्राँक्स कम्युनिटी कॉलेजचे अध्यक्ष डॉ. मिल्टन सँटियागो यांनी नुकतीच भुवनेश्वर येथे स्थित ‘के आयआयटी’ आणि ‘केआयएसएस’ या संस्थांना भेट दिली होती. डॉ. अच्युत सामंत यांच्या कामाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कला डॉ. सामंत यांच्या नावाने संस्था निर्माण करण्याची शिफारस केली. विद्यापीठाने ही शिफारस मान्य केली आणि आता तिथे या संस्थेची निर्मिती झाली.