धुळे शासकीय विश्रामगृह वसुलीकांड, गुलमोहर खोली क्रमांक 102 मधील पैशांचे प्रकरण दडपण्याचा गृहखात्याचा प्रयत्न

विधिमंडळ अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातून 1 कोटी 84 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या पैशांचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखात्याकडून सुरू असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

मिंधे गटाचे आमदार आणि विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा स्वीय सहाय्यक किशोर पाटील याचे वसुलीकांड शिवसेनेने उघडकीस आणल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. किशोर पाटील यांच्या नावे शासकीय विश्रामगृहात आरक्षित असलेल्या खोली क्रमांक 102 मधून 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. मात्र, या प्रकरणात आतापर्यंत गुन्हा दाखल न करता केवळ तपास करण्याचे नाटक करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.

कनिष्ठ कर्मचाऱ्यांना गोवण्याचे षड्यंत्र

हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश आहेत. त्यासाठी विश्रामगृहातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना बळीचा बकरा बनवण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर जर गुन्हा दाखल केला गेला तर मी आमरण उपोषण करेन, असे गोटे म्हणाले.

धुळे वसुलीकांड प्रकरणात खरंच पारदर्शक चौकशी करायची असेल तर प्रवीण गेडाम, तुकाराम मुंडे आणि धुळ्याचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा समावेश असलेली विश्वासार्ह समिती स्थापन करावी’, अशी मागणी अनिल गोटे यांनी केली.