हगवणे कुटुंबीयांचे बँकेतील लॉकर सील, बाळाच्या हेळसांडप्रकरणी नीलेश चव्हाणवर गुन्हा

सुनेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे, पुत्र सुशील हगवणे आणि सर्व कुटुंबाची पोलिसांनी शनिवारी कसून चौकशी केली. तर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी नीलेश चव्हाणवर आणखी एका कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर सील केल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैष्णवी शशांक हगवणे (23) यांच्या आत्महत्याप्रकरणी पती शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता, नणंद करिष्मा आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. पाचही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. आरोपींची वरिष्ठ पोलीस अधिकारी कसून चौकशी करत आहेत.

याबाबत सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आरोपी राजेंद्र हगवणे याचे बँकेतील ‘लॉकर’ सील करण्यात आले आहे. वैष्णवीला विवाहात देण्यात आलेले 51 तोळे सोन्याचे दागिने हगवणे कुटुंबाने बँकेकडे गहाण ठेवले आहेत. सोने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. याबाबत बँकेशी पत्रव्यवहार केला असून, गहाण ठेवलेले सोने हे हुंड्यातील असल्याचे कळविले आहे. हगवणे पिता-पुत्रांनी पसार असताना वापरलेल्या दोन आलिशान मोटारीही जप्त केल्या आहेत.

पोलिसांकडून वारंवार त्याच-त्या चुका

वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल नीलेश चव्हाणवर गुह्याचे कलम वाढविण्यात आले. त्याचा बावधन पोलिसांकडून शोध सुरू आहे. याबाबत वैष्णवीचे काका मोहन कस्पटे म्हणाले, चव्हाणची माहिती आम्ही पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर तो पळून जाऊ शकला नसता. त्याचा शोध लवकर घ्यावा. पालकमंत्र्यांनी आदेश देताच सासरा आणि दिराला अटक केली. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार शुक्रवारी वाकड येथे घरी भेटण्यास आले होते. त्यांनी त्यावेळी चव्हाणला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस आदेश आल्यानंतरच कारवाई करतात की काय अशी शंका येत आहे.

सासरा आणि दीर बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर लपल्याची कल्पना पोलिसांना दिली होती. पोलीस म्हणाले तेथे आरोपी नाहीत, आम्ही जावून आलो. आरोपी त्या ठिकाणी दोन दिवस होते, हे आता स्पष्ट झाले आहे. पोलीस वारंवार त्याच-त्याच चुका करत असल्याचा आरोप वैष्णवीच्या काकांनी केला आहे.

चव्हाणसह हगवणे बंधूंचा शस्त्र परवाना रद्द होणार

वारजे पोलीस ठाण्यात दाखल गुह्यातील आरोपी नीलेश चव्हाण तसेच वैष्णवी हगवणे प्रकरणात अटक करण्यात आलेले शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. या तिघांनाही पुणे आयुक्तालयातून परवाना देण्यात आला होता.

नीलेश चव्हाणच्या शोधासाठी तीन तपास पथके

वैष्णवीच्या दहा महिन्यांच्या बाळाला आणण्यासाठी कस्पटे कुटुंबीय गेले असता नीलेश रामचंद्र चव्हाण (रा. कोथरूड) याने पिस्तूल दाखवले होते. बाळाची हेळसांड करून संरक्षणास बाधा आणल्याने हगवणे कुटुंबीयांवर दाखल असलेल्या गुह्यात मुलांची काळजी व संरक्षण या कलमाची वाढ करण्यात आली आहे. त्यात नीलेशला आरोपी करण्यात आले आहे. त्याच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची तीन तपास पथके रवाना केली आहेत. तसेच पोलिसांनी त्याच्या भावाला शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.