कर्नाक, विक्रोळी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; पूर्व उपनगराची वाहतूककोंडी फुटणार

मशीद बंदरचा कर्नाक बंदर पूल आणि पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत. मुंबई महापालिकेकडून बांधण्यात येणारे हे पूल सुरू झाल्यानंतर पूर्व उपनगरातील वाहतूककोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे.

मुंबईतील वाढती वाहतूककोंडी सुटण्यासाठी मुंबई महापालिकेने रेल्वेबरोबर समन्वय साधत शहरात विविध रस्त्यांवर उड्डाणपूल, रेल्वे मार्गावर उड्डाणपूल, पादचारी पूल आणि स्कायवॉक बांधले जात आहेत. महापालिकेच्या पूल विभागाने काही नवीन पुलांचे बांधकाम केले आहे तर आणखी काही पुलांच्या बांधणीची कामे प्रगतिपथावर असून कर्नाक पूल आणि विक्रोळी रेल्वे पुलाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी या दोन्ही पुलांची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची कालमर्यादा तसेच रेल्वेबरोबर समन्वय साधून कामे मार्गी लावली आहेत.

विक्रोळी पुलामुळे अर्धा तास वाचणार

विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणारा उड्डाणपूल पूर्व-पश्चिम परिसरासाठी वरदान ठरणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे अर्धा तासाने कमी होणार आहे. पुलाचे पश्चिम दिशेकडील मास्टिक अस्फाल्टचे काम सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस अँटी क्रॅश बॅरियर्स आणि नॉईस बॅरियर्स बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तसेच रंगकाम आणि विद्युत खांब बसवण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी काँक्रीट भराव टाकून तो भाग उंच करण्यात आला आहे. या काँक्रीटीकरणाच्या क्युरिंगसह पुलाची अनुषंगिक कामेदेखील लवकरच पूर्ण होणार आहेत.

कर्नाकचे पोहोच मार्ग, डेक स्लॅबचे काम पूर्ण

मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. पुलाची लांबी रेल्वेच्या हद्दीत 70 मीटर तर पूर्व बाजूला (पी डि’मेलो मार्ग) 155 मीटर, पश्चिम बाजूला (मोहम्मद अली मार्ग) 255 मीटर इतकी आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग पूर्ण झाले आहेत. पश्चिमेकडील डेक स्लॅबचे कामदेखील पूर्ण झाले आहे. पूर्व बाजूकडील 80 पैकी 40 मीटर लांबीच्या डेक स्लॅबचे काम पूर्ण झाले असून त्याचा क्युरिंग कालावधी सुरू आहे. उर्वरित 40 मीटर अंतरासाठी ‘‘अर्ली स्ट्रेन्थ काँक्रिट’’चा वापर करण्यात आला आहे. रेल्वे हद्दीत अँटी क्रॅश बॅरियर्स बसवण्याची कामे सुरू आहेत. दरम्यान, पुलाची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर पुलाची ताकद, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी भार चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर वाहतूक विभागाच्या परवानगीनंतर पूल सुरू करण्यात येणार आहे.