
केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्याची आनंदवार्ता हवामान खात्याने शनिवारी दिली होती. त्यानंतर मॉन्सूनने वेगाने वाटचाल करत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व्यापले असून तो गोव्याच्या वेशीवर डेरेदाखल झाला आहे. आता पुढील दोन दिवसात तो महाराष्ट्र व्यापणार आहे. ढगाळ वातावरण आणि प्रंचड उकाड्याने मुंबईकर त्रस्त झाले होते. मात्र, रविवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आणि या गारव्याने मुंबईकर सुखावले. दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाण्यातही पाऊस सुरु झाला आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मॉन्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसातच तो महाराष्ट्र व्यापणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरासह ठाण्यात पावसाच्या सरी कोसळत आहे.
कोकण गोव्यातील बहुतांश ठिकाणांसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. यात रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर चंद्रपूर आणि नागपूर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान विभागाकडून वर्तवली आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सातारा-कोल्हापूर घाटात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा, तर रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
दिल्लीत जोरदार पाऊस, रस्त्यांवर साचले पाणी
दिल्ली शहर आणि आजुबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी पडझड झाली आहे. हवामान विभागाकडून दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळावरील 100 विमानांच्या उड्डाणावर परिणाम झाला आहे.