
जगभरात पुन्हा एखदा हिंदुस्थानचा डंका वाजत आहे. जपानला मागे टाकत हिंदुस्थान जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले आहे. हिंदुस्थानने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनून इतिहास रचला आहे. आता भारतीय अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे. नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या 10 व्या बैठकीनंतर ते म्हणाले, ‘जागतिक आणि आर्थिक वातावरण देशासाठी अनुकूल आहे. आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. आता आपण 4 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलो आहोत.
सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की, आता भारतीय अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे. आपण हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्था हिंदुस्थानच्या पुढे आहेत. आपण आपल्या योजनेवर ठाम राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आपण जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगात अस्वस्थता असताना हिंदुस्थानने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची कामगिरी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शुल्कही हिंदुस्थानच्या विकासाला रोखू शकले नाही आणि पाकिस्तानसोबतच्या तणावाचाही आर्थिक विकासावर कोणताही परिणाम झाला नाही. हिंदुस्थान बऱ्याच काळापासून जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि आता त्याने जपानला मागे टाकले आहे.
जागतिक बँकेपासून ते आयएमएफपर्यंत आणि अनेक जागतिक संस्थांनी हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची ताकद मान्य केली आहे आणि त्यांच्या अलीकडील अहवालांमध्ये म्हटले आहे की भविष्यातही हिंदुस्थानचा जीडीपी विकास दर आघाडीवर राहील. अशा परिस्थितीत, केअरएज रेटिंग्जने अलीकडेच एका अहवालात आपला अंदाज व्यक्त केला आहे की चौथ्या तिमाहीत हिंदुस्थानचा जीडीपी वाढ 6.8 टक्के असण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे आर्थिक वर्ष 2025 चा एकूण विकास दर 6.3 टक्के असेल. कृषी, हॉटेल आणि वाहतूक तसेच उत्पादन क्षेत्रातील मजबूत कामगिरी वाढीला चालना देत असल्याचे अहवालात म्हटले आहे.