राज्यभरात पावसाचे धूमशान; मुंबईत लोकल वाहतूक विलंबाने, रस्ते वाहतूकही मंदावली

यंदा तब्बल 12 दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. मात्र, लवकर आलेल्या या पावसाने राज्यात चांगलेच धूमशान घातले आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होत आहे. त्यातच हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच या पावसाचा फटका मुंबई शहर आणि उपनगराला बसला असून तिन्ही मार्गांवरील वाहतूक विलंबाने सुरू आहे. तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही मंदावली आहे.

मुंबई आणि उपनगरात पहाटेपासू मुसळधार पाऊस होत आहे. सीएसएमटी, भायखळा, हिंदमाता येथे जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. तसेच उपनगरातही अनेक भागात पावसाने पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. तसेच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे विलंबाने होत आहे. तसेच येत्या काही तासाच जोरदार पावसाचा अंदाज असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अर्लट देण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 40 किलोमीटर एवढा राहण्याची शक्यता आहे.

कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. कोकणसह राज्याला पावसानं झोडपलं आहे. मराठवाड्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. जालन्यात मुसळधार पाऊस झाला.तर बारामती आणि सोलापुरातील करमाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामध्ये मोठं नुकसान झालं आहे.