अवकाळीमुळे शेडनेटचे मोठे नुकसान; लग्न समारंभातील मंडपही उडाले

जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अस्मानी संकटामुळे फळबागांचे व भाजीपाला नेटशेडचे नुकसान होत आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे लग्न समारंभावर विरजण पडत असून, वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडून जात आहे. वऱ्हाडींची त्रैधातिरपीट उडत आहे. अवकाळीच्या संकटापासून वाचण्यासाठी वधू पित्यांना लॉन्सवर लग्न ठेवावे लागत असल्यामुळे आर्थिक खर्च वाढला आहे.

मान्सूनपूर्व अवकाळीने मे महिन्यात धुमाकुळ घातला आहे. शेतीचे कामे उरकण्यात व लग्न सराईत व्यस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने त्रस्त केले असून. शेडनेटचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. फळबागांचे नुकसान होत आहे. मे महिन्यात लग्नाच्या तिथी मोठ्या प्रमाणावर आहेत.. ग्रामीण भागात लग्न गावात किवा शेत वस्त्यांवर होतात. ग्रामीण भागात लॉन्सची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे वधू पित्यांना शेतात मंडप टाकून किवा गावातील मंदिराशेजारील जागेत मंडप टाकून लग्न कार्य करावे लागते. लग्न सराईचा जसा हंगाम सुरू झालेला आहे. तसेच बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांचा कडकडाट यामुळे लग्न कार्यावर संकट निर्माण झाले आहे. पावसामुळे लग्नाच्या वेळा बदलाव्या लागत आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास वेळ मिळत नसल्यामुळे शेतीची कामे तशीच पडली आहे. खरिपाची पेरणी लांबणीवर पडते की काय अशी भिती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात खरिपाच्या पेरणीला सुरवात होते.

लग्न सोहळ्याची व्यवसायिक वर्षभर वाट पाहत असतो. फोटोग्राफर व्यवसायातून उदारनिर्वाह चालतो. व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो. अवकाळी पावसामुळे साहित्य पाण्याखाली येत आहे. लग्नाच्या सर्वाधिक तारखा मे महीन्यात आहे. वादळी वारा व पावसामुळे मंडप डेकोरेशन व फोटोग्राफरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विकास मगरे, व्यावसायिक