
महेंद्रसिंह धोनीच्याच सावलीखाली चेन्नईचा संघ आजही वावरतोय. धोनीचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की, ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जाडेजासारख्या खेळाडूंचे नेतृत्वगुण कधी विकसितच होऊ शकले नाहीत. खरं सांगायचे तर धोनीचे संघातील अस्तित्वच अन्य खेळाडूंच्या नेतृत्वगुणांना खुलेपणाने समोर येण्यापासून रोखत आहे. एवढेच नव्हे तर जाडेजा आणि गायकवाड हे दोघेही धोनीच्याच मानसिकतेची नक्कल करताहेत. त्यामुळे त्यांच्यातील खरे नेतृत्वगुण समोर येण्यापासून वंचित राहत असल्याची टीका हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू संजय बांगर यांनी केली आहे. चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने जेव्हा जेव्हा संघात नवे नेतृत्व आणण्याचा प्रयत्न केलाय, दुर्दैवाने ते धोनीच्या प्रभावाखालीच वावरलेत, हे वारंवार दिसून आल्याचे बांगर यांनी दाखवत चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला नेतृत्वाबाबत विचार करण्यास भाग पाडले आहे.