पावसामुळे मुंबईत जी परिस्थिती ओढवली त्यासाठी भ्रष्टनाथ आणि सरकार जबाबदार, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

पावसामुळे मुंबईत जी परिस्थिती ओढवली त्यासाठी भ्रष्टनाथ आणि सरकार जबाबदार असा घणाघात टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच पावसामुळे ज्या मुंबईकरांचे नुकसान झाले त्यांना भरपाई द्या अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात कुणाचं सरकार आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी कालची परिस्थिती होती. कालचा पाऊस हा या महिन्यातला पहिला पाऊस नव्हता. आधीच्या पावसात साकीनाका पूर्ण भरून गेलं होतं. पहिला पाऊस आहे आम्हाला वाटलं सरकार यातून काहीतरी शिकेल आणि मुंबईकरांना या पावसाळ्यात काही त्रास होणार नाही अशी अपेक्षा होती. पण कालच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं.

तसेच ज्या ज्या मुंबईकरांच्या घरांत आणि दुकानांत पाणी शिरलं आणि नुकसान झालं त्यांना सरकारी तिजोरीतून नुकसान भरुपाई देण्यात यावी. काल जो गोंधळ उडाला तो फक्त पावसामुळे नव्हे तर ते सरकारचं अपयश आहे. मुंबई महानगरपालिकेचा कारभार मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास खात्यातून चालतो, कालचं अपयश हे पूर्णपणे त्यांचं आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून राज्यात अशाच प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे. गेल्या वर्षी छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत पडला. वांद्रे पश्चिम, अंधेरी, दहिसर, बोरीवली भागात भाजपच्या आदेशावर खोदून ठेवलेले आहे. हे अनेक वर्षात आपण पाहिले नसेल की मुंबई अशा पावसासाठी तयार नव्हती. मंत्रालयाच्या बाहेर कधी पाणी तुंबत नव्हतं तिथे पाणी साचलं. ब्रीच कॅन्डी रुग्लणालयावजवळ नवीन बांधललेला रस्ता खचला. हिंदमाता आणि गांधी जंक्शन या दोन्ही ठिकाणी आम्ही पूरमुक्त करून दाखवलं होतं. काल याच लोकांनी हा भाग बुडवून दाखवला. मी गेल्यानंतर पाहिलं की तिथे पंप आणत होते ते पंप तिथेच असायला पाहिजे होते असे आदित्य ठाकरे म्हणाले.

राज्यात सरकार आहे की नाही? शासन आणि प्रशासन मजा मस्तीत आहे. सरकार फोडाफोडीत व्यस्त आहे. मुंबईत ज्या ठिकाणी पाणी भरत नव्हतं तिथेही पाणी भरलं. यासाठी भ्रष्टनाथ शिंदे यांना जबाबदार धरीनच कारण त्यांचा भ्रष्टाचार सगळीकडे दिसायला लागला आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आमची मागणी आहे, राज्यात जिथे जिथे पावसामुळे नुकसान झाले आहे तिथे तिथे पंचनामे करून नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. अनेक कामं करून मुंबई पालिकेची 92 हजार कोटी रुपयांची एफडी होती. ही तिजोरी आता यांनी रिकामी केली. पालिकेच्या कारभारात अडीच लाख कोटी रुपयांच्या महसुली तुट निर्माण केली आहे. हा सगळा पैसा गेला कुठे? याचे उत्तर भाजपने देणे गरजेचे आहे.

दुसरा मुद्दा काल मेट्रो तीन एक्वा लाईन जी काल खरोखरच एक्वा लाईन झाली. 17 ते 18 दिवसांपूर्वी ज्या मेट्रोचं उद्घाटन झालं होतं तिथे भिंत कोसळली. स्पष्टीकरण आले की ती तात्पुरती भिंत बांधली होती ती काय पाडण्यासाठी बांधली होती. मेट्रोमध्ये भिंत फोडून ते पाणी आत शिरलं होतं. ज्या कंपनीकडे मेट्रोचं कंत्राट होतं की तुर्कीची कंपनी आहे. एअरपोर्टमधील तुर्कीच्या कंपनीला तुम्ही काढलं मग या कंपनीला का नाही काढलं? मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी हे मुद्दाम केलं नाही ना? रेल्वे कमिश्नरांनी अहवान दिला होता की 718 क्रॅक्स या भुयारांमध्ये होते. असे असताना तुम्ही उद्घाटन का केलं? हे चित्र फार भयानक आहे.

जर भाजपने मुंबई पुणे, आणि ठाणे महानगरपालिका हातात घेतली तर शहरांचे काय हाल होतील हे कालच्या उदाहरणावरून लक्षात येईल. पहिली गोष्ट म्हणजे काल काही पहिला पाऊस नव्हता तरी देखील पंप चालू नव्हते. नालेसाफाई पूर्ण झालेली नाहीये, तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा ईस्टन एक्सप्रेस हायवेवर जा किंवा कुठच्याही गल्लीत जा गटारीतून जो गाळ काढला होता तो तसाच बाजूला ठेवला होता. मग हे कॉमन सेन्स की तो परत त्याच्यात जाणार आहे मग महापालिका कारण देऊच कसं शकतं?

गेल्या दोन वर्षात मुंबई महानगरपालिका कोसळत चाललेली आहे. पैसे काढले जातात कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातले जातात. भ्रष्ट शिंदेंनी कधी पाहणी केली परवाच नाले सफाईची पाहणी केली होती. मला वाटतं ग्रीन कार्पेट यावेळी नव्हतं म्हणून जरा पाणी जास्ती वाढलं. भ्रष्टनाथ शिंदेच्या कारभारात हे सगळे घोटाळे झाले असतील. रस्त्याचे असेल, नाले सफाईच असेल जे काही असेल तर भ्रष्टनाथ शिंदेवर पण ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.