
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यासमोर एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. अजित रामकृष्ण मैंदर्गी असे त्या तरुणाचे नाव असून तो मूळचा सोलापूरचा रहिवाशी आहे. अजितला मलबार हिल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अजित हा पेट्रोल व लायटर घेऊन वर्षा निवसास्थानाजवळ फिरत होता. त्याच्या हातात ज्वलनशील पदार्थ असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत अजितने तो आत्मदहन करण्यासाठी आला होता असे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचे समुपदेशन ही करण्यात आले.
अजित हा सोलापूर येथील रहिवाशी असून तिथे त्याचा पॅकिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. त्याने बँकेतून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले होते. त्यामुळे बँकेने त्याच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे तो व्यथित होता व त्यातूनच त्याने अशा प्रकारचे पाऊल उचलले होते असे समजते. अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

























































