‘माथेरानची राणी’ सुट्टीवर; पावसाळा संपेपर्यंत टॉय ट्रेन बंद

माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असलेली टॉय ट्रेन म्हणजेच ‘माथेरानची राणी’ पावसाळा संपेपर्यंत बंद राहणार आहे. भूस्खलन होऊन पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ‘माथेरानची राणी’ सुट्टीवर गेल्यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला आहे.

माथेरान पर्यटनस्थळ हे मान्सूनच्या तोंडावर पर्यटकांनी बहरले असताना येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारी माथेरानची टॉय ट्रेन ही बंद झालेली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. याबाबत रेल्वे विभागाकडून अधिकृत घोषणा जारी केली नसली तरी रेल्वे विभागाने नेरळ रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटर येथे नेरळ रेल्वे स्थानक येथून माथेरानला धावणारी मिनी ट्रेन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवली असल्याचा फलक लावला आहे. मात्र अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू राहणार आहे.

नागमोडी वळणांच्या आनंदावर विरजण
डोंगरकपारीतून नागमोडी वळणे घेत, शिळ फुंकत हिरव्यागर्द झाडीतून धावणारी ट्रेन आणि त्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची माथेरान मिनी ट्रेनला पसंती असायची. तिकिटासाठी तर पर्यटकांची झुंबड उडायची. मात्र आता पावसाळा संपेपर्यंत माथेरानची राणी प्रवाशांच्या सेवेत नसेल. नागमोडी वळणांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.